दिल्ली – उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या १५२ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. हे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश आहे. तर नाशिक विभागातून सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल लाचलुचपत प्रतिबंध नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना हे पदक मिळणार आहे.
पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने २०१८ साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले. ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण १५ जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील ११, गोवा पोलिस दलातील १ आणि गुजरातच्या पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे. तसेच या मानकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी ९, तामिळनाडू पोलीस दलातील ८ आणि बिहारचे ७, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी ६ आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये २८ महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट आहेत.
अशा देशपातळीवरच्या या पदकाचे मानकरी लाचलुचपत प्रतिबंध नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे ठरले आहे.
२०११ मध्ये कडासने हे श्रीरामपूर येथे अपर पोलीस अधीक्षक असतांना शिर्डी येथील पाटणी व गोंदकर हत्याकांडामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन य़ेथे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा कडासने यांनी कौशल्यपुर्वक तपास करुन पूर्ण केला होता. त्यांनी विशेष सत्र न्यायालय नाशिक यांचे न्यायालयात गुन्हयाचे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात न्यायालयात वेळोवेळी सुनावणी होवून गुन्ह्यातील एकुण १७ जणांना ३ मे २०१८ रोजी न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. यात कुविख्यात गुंड पाप्या शेख होता. या खटल्यात १ कोटी ३८ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या तपासाबद्दल पोलीस महासंचालकांनी कडासने यांना पुरस्कार व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे.