नाशिक – वर्षभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेले सुनील बागुल यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहरे पडून त्यांनी अगोदर राष्ट्रवादी व नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, त्यानंतर वसंत गिते यांच्या बरोबर त्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. शिवसेनेत प्रवेश करतांना त्यांना महामंडळाचे आश्वासन दिले असल्याचे बोलले जात होते. पण, वर्षभरानंतरही हे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. त्यातच आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये असल्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व आले होते. पण, शिवसेनेने हे टायमिंग साधत त्यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
बागुल हे शिवसेनेत असतांना त्यांनी आपला एक दरारा निर्माण केला होता. त्यांनी अनेक पदेही भूषविली. पण, त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण, राष्ट्रवादीतही ते रमले नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या मातोश्री आजही भाजपच्या नगरसेविका आहे. पण, सुनील बागुल यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत घरवापसी केली. बागुल यांनी उपनेतेपद दिल्यामुळे आता वसंत गिते यांना काय जबाबदारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.