इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरातील गृहिणींचा दिलासा असतो. दिवसभराचा आपला कामाचा थकवा दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असतो. या मालिका दाखवणाऱ्या वाहिन्यांमध्ये अगदी आताआतापर्यंत झी वाहिनी पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने मालिकांच्या विषयांवर मेहनत घेत, विषयांचे वेगळेपण जपत या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आली आहे.
याच वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सुरू झाल्यापासून चांगलीच चर्चेत होती. टीआरपी रेटिंगमध्ये देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. या मालिकेत मुख्य नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत असणारे अभिनेते किरण माने यांच्या रांगड्या भूमिकेने मालिकेत रंग भरला होता. नंतर उद्भवलेल्या वादानंतर माने मालिकेतून बाहेर पडले तरीही ते कायम चर्चेत राहिले. त्यांनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आले. किरण मानेंनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘बिग बॉस’ मध्येही त्यांनी स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले होते. किरण माने हे उत्तम लेखक देखील आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर रांगड्या सातारी भाषेत केलेलं त्यांचं लिखाण अनेकदा चर्चेचा विषय असतो. सध्या किरण माने यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यावरून त्यांना थेट बारामतीहून फोन गेला आहे. त्यामुळे देखील ही पोस्ट खास बनली आहे.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण मानेंना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. मानेंचं साताऱ्यात जंगी स्वागत झालं. त्यानंतर अनेक कार्यक्रमांत किरण मानेंचा सत्कारही झाला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी किरण मानेंना फोन केला होता. त्यांच्या फोरमच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मानेंना उपस्थित राहण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी केली होती. किरण मानेंनी याबाबत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.
”किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलते आहे. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे.” या फोरमचं काम मला माहित असल्याने मी क्षणात होकार दिला. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींनी बारामतीमध्ये या फोरमच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलं आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटुंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहून मी अक्षरश: थक्क झाल्याचे किरण सांगतात. पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदूषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये जागरूकता यावी यासाठी त्या अथक परीश्रम घेतात. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत हे खूप मोलाचं काम आहे. या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना ‘वसुंधरा पुरस्कार’ आणि विविध क्षेत्रात जगभर नाव कमावणार्या निवडक बारामतीकरांना ‘बारामती आयकॉन’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं.
बारामती हे माझं जन्मगांव. कोर्हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे असे अनेक ‘जिवातले गणगोत’ बारामतीनं मला दिले. अशा भूमीत, अशा समाजभान जपणार्या कार्यक्रमात, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करावं यासारखा दुसरा आनंद नाही. याप्रसंगी माझ्या माणसांच्या नजरेत दिसलेलं कौतुक आणि अभिमान, ही माझ्या कामाची पोचपावती तसेच यापुढच्या वाटचालीतील शिदोरी असल्याचे माने यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. मानेंनी सुनेत्रा पवार यांच्याबरोबरचे कार्यक्रमातील काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या एक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid0CQvuheZ8VQHF8sFiXvZeGRhmCqt4oqGon5Q52L3uLyspGg1ZSTDukTJDKuBpNibwl/?mibextid=Nif5oz
Sunetra Mahajan Call to Actor Kiran Mane