नवी दिल्ली – मोठा अधिकारी असल्याची बतावणी करून अब्जाधीश उद्योजकांच्या पत्नींकडून २०० कोटी रुपये उकळणाऱ्या ‘नटवरलाल’ सुकेश चंद्रशेखर बद्दल दररोज नवनवे आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला फसविण्यापूर्वी चंद्रशेखरने अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी तो महागड्या भेटवस्तूही पाठवायचा. दहापेक्षा अधिक सेलिब्रिटी सुकेशची भेट घेण्यासाठी कारागृहापर्यंत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
इंडिया टुडेच्या वृत्तात सूत्रांचा हवाला देत असा दावा केला की, बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध तारे-तारकांसह दहापेक्षा अधिक अभिनेत्यांनी सुकेशची भेट घेतली आहे. या सेलिब्रिटी सुकेशला भेटल्यावरून बाराहून अधिक कारागृह अधिकारी तपास अधिकार्यांच्या रडारवर आहेत. जॅकलिन फर्नांडिसला कोट्यवधी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू देणार्या सुकेशने बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटी आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अनेक दावे केले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान सुकेशने दावा केला की, तो श्रद्धा कपूरला २०१५ पासून ओळखतो आणि त्याने एनसीबीच्या प्रकरणात कायदेशीर मदत केली आहे. परंतु त्याचा हा दावा बनावट असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एनसीबीने श्रद्धा कपूरचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर एनसीबीकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. अभिनेता हर्मन बवेजा आपला जुना मित्र आहे. तसेच कार्तिक आर्यनसोबत पुढील सिनेमाची निर्मिती करण्याची त्याची इच्छा होती, असा दावा सुकेशने केला आहे.
अनेक अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू
एका दुसऱ्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, सुकेशने जॅकलिन फर्नांडिससह बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला होता. आणि त्यांना तो महागड्या भेटवस्तू पाठवायचा. सुकेश अभिनेत्रींना वेगवेगळ्या नावाने भेटवस्तू पाठवायचा. संबंधित अभिनेत्रींच्या दिसण्यावर तो फिदा असायचा. जॅकलिनच्या आधी त्याने काही अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी त्याला जास्त महत्त्व दिले नाही. सुकेशने आपल्याला हिर्याचे कानातले तसेच इतर भेटवस्तू दिल्याचे जॅकलिनने आपल्या जबाबात सांगितले होते.