इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाहरुख अर्थात किंग खान याची मुलगी सुहाना खान हिने काल अलिबागमध्ये जमीन खरेदी केली. त्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण, प्रॉपर्टी म्हणून जमीन खरेदी करणे ही वेगळी गोष्ट आहे. पण, सुहाना शेती करणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. त्यामुळेच सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे. या व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन गौरीची आई आणि बहिणीच्या फार्मिंग कंपनीच्या नावावर आहे. अशाप्रकारे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रॉपर्टी देऊ शकतो का, याचा काही कायदा आहे का? जर अशा पद्धतीने गिफ्ट देता येत असेल तर याचे नियम काय आहेत? तुम्ही किती आणि काय देऊ शकता, हे तुम्हाला माहीत आहे का?
सुहानाने शेतीसाठी खरेदी केलेल्या या दीड एकर जमिनीची किंमत तब्बल १२ कोटी ९१ लाख रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित नोंदणीही १ जून रोजी झाल्याचे सांगितले जात आहे. सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपये मुद्रांक शुल्कही जमा केले आहे. अधिकृत कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार तीन विविध बांधकामांमध्ये विभागलेली जमीन तिनं खरेदी केली आहे. ही अनुक्रमे १७५० चौरस फूट, ४२० चौरस फूट, ४८ चौरस फूट कार्पेट एरियामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.
अंजली खोटे आणि इतर दोन कुटुंबासोबत तिनं हा व्यवहार केला असून अलिबगमधील थळ येथे तिनं ही जमीन खरेदी केली आहे. ज्यांच्याकडून सुहानाने ही जमीन घेतली आहे, त्यांचीही ती वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन डेजा वू फार्म प्रायवेट लिमिटेडच्या नावावर आहे. या कंपनीची संचालक गौरी खानची आई सविता छिब्बर आणि बहिण नमिता छिब्बर आहे. थोडक्यात, सुहानाने ही जमीन विकत घेऊन आपली आजी आणि मावशीच्या कंपनीच्या नावावर नोंदवली आहे. या जमिनीची मालकी सुहानाकडे आहे.
कोणती प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट देऊ शकता?
तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला तुमच्या मालकी हक्काची कुठलीही प्रॉपर्टी गिफ्ट करु शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागते.
प्रॉपर्टी गिफ्टवर किती मुद्रांक शुल्क?
भारतात गिफ्ट डीड स्टॅम्प ड्युटी प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. संपत्तीचे जे काही मूल्य असेल त्यावर हे शुल्क आकारलेले असते. ते २ ते ७ टक्क्यांदरम्यान असू शकते.
हा व्यवहार आयकरमुक्त असतो का?
वर्षभरात ५० हजारांपर्यंत जे गिफ्ट्स मिळतात, ते आयकरातून मुक्त असतात, असे आयकराचे नियम सांगतात. मात्र, ही किंमत ५० हजारांपेक्षा जास्त असेल तर यावर कुठलीही सवलत मिळणार नाही. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींसाठी यात काही सवलत मिळू शकते. तसेच एखादी संपत्ती नातेवाईकाला गिफ्ट म्हणून दिली, तर घेणाऱ्याला टॅक्स लागत नाही.