विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशांतर्गत बाजारात साखरेचे दर हे २ महिन्यांत तब्बल १३ टक्क्यांनी वाढले असून चार वर्षांतील हा सर्वात उच्चांकी दर आहे. यामुळे साखर कारखान्यांना भारतात जागतिक बाजारपेठेइतकीच किंमत मिळू लागली आहे. परंतु साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कारण रोजच्या जीवनात सकाळी उठल्यावर चहा करण्यापासून ते जेवणातील गोड पदार्थ पर्यंत प्रत्येक घरात साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. याबाबत नॅशनल असोसिएशन ऑफ कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नायकनवरे म्हणाले की, साखर कारखान्यांना स्थानिक बाजारपेठेतच साखरेचे चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे सध्या निर्यातीसाठी नवीन करार केले जात नाहीत. जागतिक बाजारात किंमती आणखी वाढतील तेव्हाच नवीन करारांचा विचार केला जाईल. साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी नवीन करार तात्पुरते रोखले आहेत. २०२१-२२ साठी फक्त १२ लाख टन साखरेचा करार झाला आहे. भारतातून जागतिक बाजारात पाठवले जाणारे साखरेचे भाव आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, कारण सर्वात मोठा उत्पादक ब्राझील या वर्षी कमी साखर निर्यात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेचे मूल्य वाढले तर नवीन निर्यात करारांवर विचार केला जाईल.
देशांतर्गत बाजारात साखरेची किंमत
३६,९०० रुपये प्रति टन आहे. नोव्हेंबर २०१७ नंतर साखरेचा हा सर्वाधिक भाव आहे. त्याचबरोबर निर्यातदार कारखान्यांना ३१,५०० रुपये कच्ची साखर आणि ३२,००० रुपये प्रति टन पांढरी साखर असा दर मिळत आहे. निर्यातदारांपेक्षा प्रति टन सुमारे पाच हजार रुपये अधिक स्थानिक कारखान्यांना मिळत आहेत. त्यामुळे यंदा साखर विपणन वर्षात विक्रमी ७.५ दशलक्ष टन निर्यात करणाऱ्या कारखान्यांनी ऑगस्टपासून कोणताही करार केला नाही. जागतिक बाजारपेठेशी संबंधित साखर विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, नवीन वर्षात देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव खाली येतील. उत्तर प्रदेशात साखर कारखाने अद्याप सरकार कडून उसाचे दर ठरवण्याची वाट पाहत आहेत. सध्याच्या निर्यातीतील कपातीमुळे जागतिक बाजारात भाव वाढतील, असा अंदाज आहे, त्यामुळे पुढील सत्रात ५ दशलक्ष टन पेक्षा जास्त साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.