इंडिया दर्पण ऑनलाईने डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी करावाई केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
दोन दिवसापूर्वी खा. संजय राऊत नाशिकमध्ये असतांना बजगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल त्यांनी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फुटीचे वारे वाहत असल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाने अगोदर ही कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर गैरहजर होते. तर महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.
पक्ष विरोधी काम केल्या मुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.