अशोकनगर भागातील २१ वर्षीय तरूणीची आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणा-या २१ वर्षीय तरूणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. साक्षी दिनकर गीते (रा.सोनाई निवास,स्वामी विवेकानंदनगर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. साक्षी गिते हिने मंगळवारी (दि.९) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच तिची आई मीरा गिते यांनी तिला तात्काळ नजीकच्या सुशिला हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
विहीरीत पडल्याने ८५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु
नाशिक : विहीरीत पडल्याने ८५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाल्याची घटना पंचक येथील पिंपळ पट्टी मळा भागात घडली. वृध्दाची काळी टोपी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. माधवराव चिमाजी बोराडे (८५ रा.महालक्ष्मी मंदिराजवळ,पंचक जेलरोड) असे विहीरीत पडल्याने मृत्यु झालेल्या वृध्दाचे नाव आहे. बोराडे हे मंगळवारी (दि.९) घरात नसल्याने कुटूंबियांनी परिसरात शोध घेतला असता घरानजीकच्या विहीरीत त्यांची काळी टोपी आढळून आली. परिसरातील शेतकºयांच्या मदतीने विहीरीत शोध घेवून त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याबाबत बोराडे यांचे पुतणे कांतीलाल बोराडे यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गिते करीत आहेत.