सख्या बहिणी झाल्या देराणी-जेठाणी
शेतीतही त्यांनी केली अशी कमाल
एकत्र येऊन शेती केल्याने प्रगती कशी द्विगुणित होत जाते याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणाऱ्या सोनाली भवर आणि जयश्री भवर या नवदुर्गांचा प्रवास जाणून घेऊया…
सोनाली व जयश्री भवर या नात्याने बहिणी लग्नानंतर एकाच घरी गेल्या. शेतीची आवड माहेरी होतीच. त्याचा पुढचा टप्पा सासरी सुरू झाला. शेतीविषयी असणारा जिव्हाळा ओळखून दोघींनी मिळून शेतीत विकास घडवून आणण्याचा ध्यास घेतला. बेहेड येथील सोनाली व जयश्री भवर यांना जावांपेक्षा बहिणी म्हणून जास्त ओळखले जाते. शिरवाडे वणीचे माहेर असलेल्या सोनाली यांचे लग्न २००५ साली शरद भवर यांच्याशी झाले तर लासलगावचे माहेर असलेल्या जयश्रीचे लग्न २०१० साली श्रीराम भवर यांच्याशी झाले. सोनाली यांचे लग्न झाले तेव्हा सासूबाईंकडून त्या शेतीविषयी अधिक मार्गदर्शन घेत गेल्या. त्या वेळी एकूण ३ एकराचे शेतीक्षेत्र होते. टोमॅटो, सोयाबीन, गहू हि पिके होती.
पुढे जयश्रीताई सासरी आल्यानंतर सोनाली यांच्या रूपाने मोठी जाऊ या नात्याने जणू एक बहीण त्यांना मिळाली होती. सोनाली यांच्या पावलावर पाऊल टाकत जयश्रीने स्वतःमध्ये बदल केला. शेतीची आवड होती पण अनुभव नव्हता. हळूहळू सर्व शेतीतली कामं, नियोजन त्या शिकत गेल्या. दोघीजणी घरची कामं सकाळी साधारण ९ वाजेपर्यंतच उरकून जास्तीत जास्त वेळ शेतीकडे देऊ लागल्या.
शेतीत नवनवीन बदल कसे करता येऊ शकता याबाबत विचार त्या करू लागल्या. शेतीत बऱ्याचदा मजूर मिळत नव्हते अश्या परिस्थितीत सर्व कुटुंबाला एकत्रित करून हि कामे पूर्ण करून घेत. पुढे शेतीतील प्रत्येक कामास आपण सक्षम असलो पाहिजे यासाठी ट्रॅक्टर, गाडी चालवणे त्या शिकल्या. दोन्ही सुनांची शेतीविषयीची असणारी आवड आणि कौशल्य पाहता सासऱ्यांनी शेतीची जबाबदारी आपल्या सुनांच्या खांद्यांवर देण्यास सुरूवात केली.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे या उद्देशाने फवारणीसाठी स्प्रेईंग युनिट वापरायला सुरु केले, यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर खरेदी केला तसेच सॉर्टींग, ग्रेडिंग चे काम योग्यरीत्या होण्यासाठी पॅकिंग शेड बांधले. अशा पद्धतीने हळूहळू विविध बदल होत गेले. यामध्ये अनेक अडचणी देखील आल्या जसे एकपिक पध्दतीमुळे बऱ्याचदा अडचणी येत. मग या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पारंपरिक पिकांमध्ये बदल करत वातावरणाच्या बदलानुसार पिके घेतली पाहिजे असे दोघींना वाटू लागले.
वातावरणातील बदल आणि पिकांचे कमी होणारे एकरी उत्पादन याला पर्याय म्हणून त्यांनी नवीन पिकांची लागवड केली. तसेच पूर्ण शेती एकाच पिकावर अवलंबून न ठेवता त्यांनी बहुपर्यायी पीकपद्धत अवलंबली. यामुळे पुढे एका पिकात जरी नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकामुळे आर्थिक परिस्थिती सावरून निघत. उदा. एका वर्षी द्राक्षासोबत टोमॅटो लागवड केली गेली ज्यामुळे त्या वर्षी द्राक्ष पिकाचे झालेले नुकसान टोमॅटोमुळे भरून निघाले. सगळ्यात मोठी अडचण हि लॉकडाऊन काळात निर्माण झाली होती.
ज्यामध्ये उद्या द्राक्षाचे हार्वेस्टिंग होणार तर आज लॉकडाऊन घोषित करण्यात आला ज्यामुळे दुसऱ्या दिवशी माल नेण्यास गाड्या येऊ शकणार नव्हत्या. अशा काळात मजुरांना सोबत घेऊन हार्वेस्टिंग करत पॅकिंग मटेरियल मागवून फिल्ड पॅकिंग करण्यास सुरुवात केली. त्यापुढील परिस्थिती थोडी कठीण होती कारण या काळात प्रतिकिलो ७-८ रुपये एवढा कमी भाव द्राक्षांना त्या वेळी मिळणार होता. पण कोल्ड स्टोरेजला माल ठेऊन पुढे जास्त भाव त्याला मिळू शकण्याची केवळ शक्यता होती. त्यामुळे द्राक्षे कोल्ड स्टोरेजला ठेवावी अशी दोघींची इच्छा असताना कुटुंबातील सदस्य या निर्णयाला जास्त सहमत नव्हते. दोघींनी आपली ठाम भूमिका घेत कुटुंबातील प्रत्येकाला विश्वासात घेत बऱ्यापैकी माल कोल्ड स्टोरेजला ठेवला. दोघींची ही भूमिका खरोखर योग्य ठरली कारण ७-८ रुपयाने विकला जाणारा माल कोल्ड स्टोरेजला ठेऊन काही दिवसांनी विक्रीस काढल्याने २२ रुपयांनी विकला गेला.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिला विकसित करण्याचे स्वप्न दोघींचे आहे. ज्यामध्ये शेतीत वापरल्या जाणाऱ्या सेन्सर स्टेशन विषयी दोघीनी ऐकले आहे. या सेन्सरच्या माध्यमातून पाणी, खत व इतर अनेक नियोजनाविषयी अचूक व्यवस्थापन करता यावे यासाठी या सेन्सर प्रणालीचा अवलंब आपल्या शेतावर त्यांना करायचा आहे. पूर्वी तीन एकराचे असणारे शेतीक्षेत्र आज ८ एकराचे झाले आहे. या सगळ्यांत कुटुंबातील सर्व सदस्य सासू-सासरे, पती यांचे योगदान आणि पाठिंबा अतिशय महत्वाचा होता.
आजही तितक्याच एकजुटीने दोघी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत शेतीचे व्यवस्थापन जोमाने आणि त्याच उत्साहाने पार पाडत आहेत. एकमेकींच्या कलागुणांना वाव देत शेतीत जिद्द आणि उत्साहाने काम करत विकासाचा ध्यास घेतलेली जोडी शेतीमधील महिलांसोबत पुरुषांनाही आदर्श ठरावी अशीच आहे. बघा त्यांचा व्हिडिओ
सौजन्य – सह्याद्री अॅग्रो फार्म्स