अनुभव नसताना
सोनेवाडीच्या नीलम यांनी
पतीची शेती केली दुप्पट
आपले शिक्षण पतीपेक्षा जास्त असूनही त्याचा कधीही गर्व न बाळगता पतीच्या साथीने आयुष्याला दिशा देत आज शेतीत प्रगती करण्याचा ध्यास घेतलेल्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया – नीलम सचिन पडोळ (सोनेवाडी, ता.निफाड)…
एकेकाळी कुटुंबातील सर्व सदस्य अनेक अडचणींमुळे घराबाहेर असल्याने शेतीची सर्व जबाबदारी स्वतःवर घेत जिद्दीने उभे राहत सर्व परिस्थिती यशस्वीपणे सावरून घेणार्या नीलमताईंच्या आयुष्यातील हे एक मोठे वळण होते. दारणा सांगवी, नाशिक येथील माहेर असलेल्या नीलमला पुढे फार्मसी मध्ये शिक्षण घ्यायची इच्छा होती. पण कॉलेजला जाण्यासाठी सोबत कोणीही नसल्याने चांदोरी येथे कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला. प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला. पती सचिन यांचे शिक्षण ११ वी पर्यंतच झालेले असून शेतीसोबतच शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या संघटन व समानव्ययाचे काम ते पाहत.
नीलम यांची माहेरी शेती होती पण शिक्षणामुळे कधी त्यात काम करण्याचा अनुभव त्यांना नव्हता. शिक्षण अर्ध्यातच सुटल्याने त्यांना काही प्रमाणात निराशा आली होती. पण पुढील काळ हा ताईंच्या आयुष्याला एक वेगळे सकारात्मक वळण देणारा ठरला. पतीची शेतीमधील आवड पाहून त्यांना शेतीचे महत्त्व कळले व त्यात रुची निर्माण होत गेली. आपणही हे करून पहिले पाहिजे असे वाटू लागले. माहेरी असताना दुचाकी चारचाकी हे सर्व चालवता येत असल्याने ट्रॅक्टर चालवायला त्यांनी सुरुवात केली. मग कधी घरी कोणी नसताना त्या स्वतःच शेतमाध्ये पावडर मारण्याचे काम त्या करून घेत.
पुढे हळूहळू मजूरांचे व्यवस्थापन, पावडर मारणे, खते अशी काही कामे त्या करू लागल्या. यामधून शेतीविषयी आवड वाढतच गेली. नंतर द्राक्षकाडी नियोजन, विरळणी, बगला काढणे अशा अनेक कामांविषयी त्या बारकाईने शिकत गेल्या. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या या कामाला प्रोत्साहन देत होते. २०१७ पासून द्राक्ष निर्यात करण्यास सुरुवात केली. आता द्राक्ष निर्यात करण्यासाठी कोणकोणत्या काळजी घेणे आवश्यक आहे तसेच काय काळजी घेतली पाहिजे हे सर्व पती सचिन यांच्यासोबत त्यादेखील शिकत गेल्या.
पुढे शेतीचे यांत्रिकीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. द्राक्षाचे डिपींग चे काम जेव्हा मजुरांकडून केले जात तेव्हा घड पूर्ण बुडवला जात नव्हता. त्यासाठी व्हीएमए मशीन विकत घेतले आणि स्प्रे पूर्ण पाकळ्यांपर्यंत मारला जात ज्यामुळे द्राक्षाचा मणी फुगायला चांगली मदत होऊ लागली. त्यामाध्यमातून ट्रॅक्टरला हे मशीन जोडून डिपींगचे काम केले जाऊ लागले. पुढे सचिन यांचे शेतकरी समन्वयाचे काम वाढू लागले. त्यामुळे बऱ्याच जबाबदाऱ्या त्या सांभाळून घेत. शेतीतील बऱ्यापैकी कामात तरबेज झालेल्या नीलमसाठी हा काळ परीक्षा घेणारा ठरला.
२०२१ मध्येच सासर्यांचं डोळ्याचे आणि किडनीचे ऑपरेशन करण्यात आले. त्यासाठी त्यांना नाशिकला हलवण्यात आले. सचिन हे वडिलांसोबत नाशिकला होते. जवळच्या नातलगाचे निधन झाल्याने सासूबाई बाहेरगावी होत्या. नाशिकमध्ये राहणारे दीर व त्यांच्या पत्नीला करोनाची लागण झाली. घरची संपूर्ण जबाबदारी नीलमवर येऊन पडली. महत्त्वाची जबाबदारी शेतीची होती. घरकामापेक्षा हे अवघड होते. टोमॅटो बांधणीला आलेले होते, द्राक्षबाग सबकेन अवस्थेत होते. अश्या स्थितीत शेती वाऱ्यावर सोडून चालणार नव्हती. नीलमने स्वतः उभे राहण्याचे ठरवले.
हिंमत न हारता मजुरांना हाती घेत स्वतः द्राक्षबागांना निंदणे, फवारणी करणे, शेणखत टाकणे दुसरीकडे टोमॅटो बांधणी अशी अनेक कामे जबाबदारीने पार पाडली. या श्रमाचे फळ म्हणूनच जवळजवळ चांगल्या गुणवत्तेची १५० क्विंटल द्राक्ष निर्यात केली. त्या वेळी एकूण २ एकर क्षेत्र होते जे आज ४ एकर झाले आहे. टोमॅटो, टरबूज, कांदे सोयाबीन या पिकात सध्या काम केले जात आहे. यापुढेही शेतीत नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
एकेकाळी शिक्षण अपूर्ण राहिल्याने निराश झालेल्या नीलमला आज एक शेतकरी म्हणून काम करत असल्याचा अभिमान वाटतो आहे. आनंदी, सर्जनशील आणि सक्षम असे नीलम या नावाचे अर्थ आहेत. नीलमताई सक्षम आणि सर्जनशील आहेत हे त्यांनी सिद्ध केले. त्याची परिणती केवळ त्यांच्याच नव्हे तर कुटुंबाच्या आनंदात झाली. नीलमला सलाम!