सातवी शिकलेल्या मीराबाईंनी
अशी फुलवली द्राक्ष शेती
एकीकडे पतीची नोकरी असून देखील आपले अस्तिस्त्व असले पाहिजे, या उद्देशाने स्वतः शेती व्यवस्थापन करणाऱ्या या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया – मीराबाई यादवराव रसाळ
कोऱ्हाटे (ता. दिंडोरी ) येथील माहेर असलेल्या मीराबाईंचे ७वी पर्यंत शिक्षण झाले होते. पुढे १९७९ ला पाचोरे वणी येथील यादवराव रसाळ यांच्याशी त्याचा विवाह झाला. लग्नानंतर एकत्र कुटुंब होते आणि यादवराव हे निफाड साखर कारखान्यास नोकरीला होते. घरच्या सर्व कामांमध्ये मीराबाई हातभार लावत सोबत अधुनमधुन शेतातील कामांत मदत म्हणून जात. शेतीत विशेष अशा अनुभव कधी त्यांना नव्हता पण लग्नानंतर शेतीविषयी एक आवड मात्र होती. १९८६ साली मीराबाई आणि मुलं, यादवराव यांच्यासोबत कारखान्यावर राहण्यास गेले.
१९९६ साली त्यांचे कुटुंब विभक्त झाले सोबतच जमिनीच्या वाटण्या करून देण्यात आल्या. त्यावेळी मीराबाई आणि यादवराव यांच्या वाट्यास केवळ अडीच एकर जमीन देण्यास आली होती. मीराबाईंना आपले स्वतःचे अस्तित्व असले पाहिजे असे कायम वाटत असायचे. त्यामुळे या शेतीची पूर्ण जबाबदारी घेण्याचे त्यांनी ठरवले. विशेष म्हणजे कुटुंबाची, मुलांची जबाबदारी सांभाळत कारखान्यावरून रोज २५ किमी दूर पाचोरे वणी येथे त्या शेती येऊन जाऊन करत. सुरुवातीला भाजीपाल्यामध्ये काम चालू होते.
२००१ साली द्राक्षशेती करायचे ठरवले. हि द्राक्षबाग लावण्यासाठी सुरुवातीला भांडवलाची मोठी अडचण होती त्यासाठी सोसायटीतून साधारण एक लाखांचे कर्ज घेण्यात आले. द्राक्षशेतीत कधी अनुभव नसल्याने सुरुवातीला केवळ सव्वा एकरावरच हि द्राक्षबाग लावण्यात आली आणि त्याविषयी माहिती त्या इतर अनुभवी शेतकऱ्यांकडून जाणून घेत गेल्या. त्या वेळी थॉमसन या व्हरायटीची लागवड केली होती. द्राक्षपिकात पहिल्यांदा काम करत असूनही पहिल्या वर्षी २१ क्विंटलचे उत्पादन काढले. त्या वर्षीं आलेल्या उत्पन्नातून २००२ साली आणखी अडीच एकर जमीन खरेदी केली.
हळूहळू जबाबदारी वाढत चालली होती त्यामुळे मीराबाईंनी स्वतः शेताकडे येऊन राहण्याचे ठरवले.
शेतावर एक पत्र्याचे शेड बांधून त्या ठिकाणी मुलांना घेऊन त्या राहू लागल्या. यानंतर मग शेतीत देखील अधिक वेळ त्या देऊ शकत होत्या. पती यादवराव हे अधून मधून भेट देत. पुढे मोठ्या मुलाची मदत या कामांत होऊ लागली. पहिल्या वर्षी २१ क्विंटलचे निघालेले उत्पादन दुसऱ्या वर्षी ४५ क्विंटलपर्यंत वाढले आणि तिसऱ्या वर्षी ८५ क्विंटल अशा प्रकारे द्राक्षशेतीतील आलेख हा हळूहळू उंचावत गेला. मुलं मोठी होऊन त्यांची लग्न झाली. शेतीतील सर्व नियोजन जिद्दीने करत असताना एका घटनेने मात्र मीराबाई खचून गेल्या कारण मोठा मुलगा योगेश याचे अचानक झालेल्या अपघातामुळे २००८ साली वयाच्या २७व्या वर्षी निधन झाले. या घटनेमुळे मीराबाई ह्या अतिशय निराश झाल्या. पण योगेश यांच्या जागेवर लहान मुलगा सचिन हा नंतर शेतीत हातभार लावू लागला.
पुढे या परिस्थितीतून सावरत त्या पुन्हा उभ्या राहिल्या. २००९ साली ट्रॅक्टर, मशीनरी खरेदी करून शेतीचे यांत्रिकीकरण त्यांनी केले. त्यानंतर मीराबाईंनी द्राक्ष निर्यात करायचे ठरवले पण द्राक्ष निर्यातीसाठी बऱ्याच प्रकारच्या तांत्रिक गोष्टी शिकणे आवश्यक होते. २०११-१२ पासून त्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीशी जोडल्या गेल्या व त्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवत द्राक्ष निर्यात कारण्यास त्यांनी सुरुवात केली. २०१५-१६ साली आणखी अर्धा एकर जमीन खरेदी करत एकूण सव्वाचार एकराचे क्षेत्र झालं आहे.
शेतीची जबाबदारी सांभाळण्यात आज मुलगा आणि सुनदेखील सोबतीस आहेत. आजपर्यंत शेतीत मेहनत करून मीराबाईंनी तिला यशस्वीरीत्या सांभाळले त्याच शेतीची दिवसेंदिवस प्रगती यापुढेही होत राहावी हेच मीराबाईंचे स्वप्न आहे. आजही मीराबाई सर्व कुटुंबासमवेत २००२ साली राहण्यास आल्या त्याच ठिकाणी राहत आहेत. ज्या शेतीत आपल्या भावना आणि आवड गुंतलेली आहे त्याच शेतीत जिद्दीने कष्ट करून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मीराबाईंना सलाम! बघा त्यांच्या कार्याचा हा व्हिडिओ