इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की, ”कौन कहता है कि कामयाबी सिर्फ किस्मत तय करती है, अगर दम हो इरादों में तो मंजिलें खुद-ब-खुद झुका करती हैं।” म्हणजेच कोणतीही गोष्ट केवळ नशिबाने नव्हे तर कष्टाने मिळते. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते, तर कोणतेही यश मिळवणे कठीण नसते. अनेकांच्या बाबतीत आपल्याला दिसून येते केरळमध्ये रेल्वे स्टेशनवर काम करणारा कुली तथा हमाल याच्या जीवनात देखील अशीच एक घटना घडली आहे.
परिश्रमपूर्वक अभ्यास करीत त्याने चक्क यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून हा तो आता आयएएस अधिकारी बनला आहे, त्याची ही यशकथा तथा यशोगाथा ऐकून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एर्नाकुलम स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या या तरुणाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. काही वर्षांपूर्वीपर्यंत कुली म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने आयएएस अधिकारी बनून जगासमोर यशाचे नवे उदाहरण ठेवले आहे.
अनेकदा यश न मिळाल्याबद्दल काही जणांना तक्रार करताना पाहिले असेल, बहुतेक जण त्यांच्या अपयशाचे कारण म्हणून संसाधनांच्या कमतरतेला दोष देतात. तसेच त्यांना सर्व सुखसोयी मिळाल्या असत्या तर ते आयुष्यात काहीतरी चांगले करू शकले असते, असा त्यांचा विश्वास आहे. पण याबाबत श्रीनाथची कधीच तक्रार नव्हती. आपत्तीचे संधीत रूपांतर करून त्यांनी नवी उंची गाठली. त्यांनी आपल्या यशाच्या मार्गात संसाधनांची कमतरता कधीही येऊ दिली नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. यासाठी ते अनेक वर्षे मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये खर्च करून तयारी करतात, पण मूळचा केरळचा असलेला श्रीनाथ रेल्वे स्टेशनवर पोर्टर म्हणून काम करतो, इतकेच नव्हे तर कोणत्याही क्लास किंवा कोचिंगच्या मदतीशिवाय तो यूपीएससीमध्येही यशस्वी झाला आणि केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही नाव उंचावले आहे.
श्रीनाथ कोचिंग सेंटरची फी भरू शकत नव्हता आणि त्याच्या मनात एकच गोष्ट होती की, कोचिंग सेंटरशिवाय तो ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही. यामुळेच त्याने केपीएससीची तयारी सुरू केली. रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. या वाय-फायवरून त्याने आपल्या स्मार्ट फोनवर अभ्यास सुरू केला. हे मोफत वायफाय त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नव्हते. तो इथे पोर्टर म्हणून काम करायचा आणि वेळ मिळताच ऑनलाइन लेक्चर्स ऐकायचा. आपल्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर श्रीनाथला KPSC मध्ये यश मिळाले. इथून त्याला विश्वास मिळाला की, तो फ्री वाय-फायच्या मदतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण करू शकतो आणि त्याने तसे केले देखील.
तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी कुली श्रीनाथचे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केले होते. गोयल यांनी लिहिले, “रेल्वेकडून मोफत वायफायने केरळमध्ये पोर्टर म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या वायफायचा वापर करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळवले, त्याचे मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.