नाशिक – एका दिवसाच्या नवजात अर्भकाची कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची आनंददायी बातमी आहे. आई गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा जंतुसंसर्ग झाले. त्यानंतर बाळाच्या आई मध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळ द्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोहोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. पण, आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, डॉक्टरांचे परिश्रम व योग्य उपचारामुळे १८ दिवसाच्या प्रयत्नानंतर बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश मिळाले.
याबाबत अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेने एका २.७६० किग्रॅ. वजनाच्या एका गोंडस बालकाला जन्म दिला. त्या महिलेच्या कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण झाले होते, मात्र जन्मानंतर काही तासातच त्या अर्भकास श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ लागला. व बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाळाला ऑक्सिजन वर ठेवण्यात आले. बाळाच्या हृदयाची गती व रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. बाळाच्या फुफ्फुसांमध्ये निमोनियाची लक्षणे दिसून आली व बाळाच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यात बाळा चा एच आर सिटी स्कोर १२ होता. डॉ. सुशील पारख (बाल रोग तज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल), डॉ. नेहा मुखी (बालरोग तज्ञ), डॉ. पूजा चाफळकर ( बालरोग तज्ञ ) या डॉक्टरांच्या टीमने या बाळावर उपचार करण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, सर्व ज्युनियर डॉक्टरांचे परिश्रम व उपचार पद्धती याच्या जोरावर १८ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर या बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश मिळाले आहे. यामध्ये हॉस्पिटल मधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ व ज्युनियर डॉक्टर यांच्या परिश्रमाने बाळ सुखरूप घरी गेले आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. सुशील पारख यांनी सांगितले की आई गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा जंतुसंसर्ग झाल्याचे निदर्शनास आले व त्यानंतर बाळाच्या आई मध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळ द्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोहोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. याला वैद्यकीय भाषेत FIRS (Fetal Inflammatory Response Syndrome) म्हणतात. अशाच प्रकारची प्रक्रिया जर अधिक वयाच्या कोविड बाधित बाळामध्ये झाल्यास त्याला MIS – C (Multisystem Inflammatory Syndrome in Children) म्हणतात. एक दिवसाच्या बाळामध्ये निदर्शनास आलेली FIRS जगात एखाद दुसऱ्या घटनेचा उल्लेख वैद्यकीय शास्त्रात आहे. भारतात ही पहिली घटना आहे असे डॉ. पारख यांनी सांगितले. गर्भवती महिलेला कोविडचा जंतुसंसर्ग झाल्यामुळे नवजात अर्भकाच्या हृदयावर व फुफ्फुसावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती डॉ. सुशील पारख यांनी दिली आहे.
गर्भवती महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे या महिलांनी अतिशय काटेकोरपणे कोविड पासून वाचण्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व त्यामुळे बाळाला होणारा संभाव्य दुष्परिणाम टाळता येतो, असे आवाहन डॉ. सुशील पारख यांनी केले आहे. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी व त्यानंतर होणाऱ्या नवजात अर्भकांसाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, व फिजिशियन यांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आलेला आहे व त्याद्वारे बऱ्याच कोविड बाधित महिलांची व नवजात शिशुंचे उपचार यशस्वीपणे करण्यात या डॉक्टरांच्या टीमला यश आलेले आहे.