‘यशस्वी’ स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची यशस्वी कथा
महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा संचलित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे.
महिला बचतगट म्हटल की आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने समोर येतात. परंतू याला फाटा देत यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे. काजू बी खरेदीपासून त्याच्या विविध प्रतवारी नुसार विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. शिवाय काजूच्या राहिलेल्या तुकड्यांमधून काजू मोदक, बर्फी, लाडू, खारे काजू, मसाला काजू अशा उत्पादनानेही बाजारपेठ मिळवली आहे. याबाबत राजश्री परितपते यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, 2007 साली माविम अंतर्गत आमचा महिला बचतगट स्थापन झाला. या बचत गटात 10 महिला असून 2012 ला सेंट्रल बँकेकडून 2 लक्ष 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून सुरुवातीला 2 ते 3 वर्ष आम्ही काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. परंतु त्यामधील मार्केटिंगची बाजू हाताळण्यासाठी सीएमआरसीचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेतले.
सद्या अन्य महिला बचतगटातील शेतकरी महिलांकडून आम्ही काजू बी खरेदी करतो. बाजारभावापेक्षा एखादा रुपया जादा देत अशा काजू बी वर प्रक्रियाकरून स्वयंचलित कटरवर कट करतो. आतील काजूगर ड्रायरवर वाळवण्यात येतो. त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात येते. या प्रतवारीनुसार त्याचा दर ठरतो. असे तयार काजू आकर्षक वेष्टनामधून घाऊक तसेच किरकोळ स्वरुपात विक्री केला जातो. ही प्रक्रिया करत असताना काही प्रमाणात काजू कणी आणि तुकड्याच्या स्वरूपात काजू तयार होतो. या पासून सद्या गणेशोत्सवासाठी मोदक, बर्फी, लाड असे पदार्थ बनवण्यात येत आहेत. या पदार्थांनाही बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने गटाला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांनाही चांगला रोजगार दिला जातो.
सुरुवातीला घरातील पुरुष मंडळींकडून पैसे घ्यावे लागायचे परंतु सद्यस्थितीत काजू प्रक्रिया उद्योगाने आम्हा महिलांना आर्थिक उत्पन्न देऊन स्वयंपूर्ण बनवले आहे. एकूणच यशस्वी स्वयंसहाय्यता महिलांच्या हा काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी झाला असून या यशगाथेची प्रेरणा जिल्ह्यातील अन्य बचतगटांच्या महिलांनी घ्यायला हरकत नाही.
– प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग)
Success Story of Women Self Help Group Cashew Processing Kokan Sawantwadi Sindhudurga