मुंबई – कुबेराला लाजवेल इतके धन म्हणजे डोळे दिपवणारी संपत्ती. त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळे सहाजिकच कोण सर्वात जास्त श्रीमंत आहे. याबद्दल भारतीय लोक नेहमीच चर्चा करतात. त्यातही जगात सर्वाधिक श्रीमंत कोण आहे? याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायला आवडत असते.
जगात असे हजारो लोक आहेत, ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. अशा लोकांच्या यादीत काही भारतीयांचा देखील समावेश आहे. दरवर्षी काही संस्था आणि नियतकालिके अशा लोकांच्या याद्या प्रसिद्ध करतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका यादीत आपल्या देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि व्यापारी तसेच डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी आता सामील झाले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेअनिअर इंडेक्सनुसार, राधाकिशन दमानी यांची संपत्ती १९.३ अब्ज म्हणजेच १.४२ लाख कोटी रुपये एवढी आहे. संपत्तीच्या बाबतीत दमानी जगातील श्रीमंतांच्या यादीत ९७ व्या स्थानावर आले आहेत. विशेष म्हणजे दमानी यांच्याबरोबरच प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, शिव नादर आणि लक्ष्मी मित्तल या पाच भारतीय अब्जाधीशांचाही टॉप १०० श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
सध्या डी-मार्ट किरकोळ बाजारात वर्चस्व गाजवत आहे. वास्तविक डी-मार्टची मूळ कंपनी एव्हेन्यू सुपर मार्केटस लिमिटेड (एएसएल) आहे. राधाकिशन दमानी या कंपनीचे संस्थापक आहेत. दमानी यांनी २००२ मध्ये मुंबईत आपले पहिले डी-मार्ट स्टोअर सुरू केले. डी-मार्टचे आज महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, एनसीआर, तामिळनाडू, पंजाब आणि राजस्थानमध्ये २३८ स्टोअर आहेत. २०१७ मध्ये डी-मार्टची मूळ कंपनी एव्हेन्यू सुपर मार्केट्स लिमिटेड स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली.
नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये असल्याने दमानी यांना अनेकदा ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ या नावानेही संबोधले जाते. ऐंशीच्या दशकात ५ हजार रुपयांसह शेअर बाजारात दाखल झालेल्या दमानी यांना भारतीय इक्विटी मार्केटमध्ये एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. दमानींबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे ते मीडियाच्या प्रसिद्धपासून दूर राहतात. त्यामुळे सर्वसामान्यांना यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. परंतु एप्रिल महिन्यात दमानी यांनी मलबार हिल्सवर १००१ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला. तेव्हा ते चर्चेत आले. आतापर्यंत खरेदी केलेला सर्वात महागडा बंगला अशी त्याची ओळख आहे. प्रामाणिकपणा, कष्ट आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांना कुठलाही अहंकार नसून त्यांचे पाय अजूनही जमिनीवर असल्याने दिवसागणिक ते एक-एक यशोशिखर गाठत आहेत.