पतीच्या निधनानंतर
मेहनतीने दुप्पट शेती करणाऱ्या
आवनखेडच्या शारदा वसाळ
‘शिक्षण घेऊन शेतीत आवड असल्यास त्याच शिक्षणाचा वापर करून शेतीत आधुनिक बदल करत गेलं पाहिजे’ या आपल्या विचाराने एकेकाळी स्वतः शेतीची सर्व व्यवस्थापन सांभाळत आज आपल्या पुढच्या पिढीस देखील हा वारसा देणार्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया – शारदा यादवराव वसाळ (आवनखेड,दिंडोरी)
कुर्णोलीचे (ता. दिंडोरी ) माहेर असणाऱ्या शारदाताईंचे ४ बहिणी व २ भाऊ अशा कुटुंबात असून १९६३ साली ताईंचा जन्म झाला होता. त्या वेळी वडील देखील सोसायटीमध्ये नोकरीस होते. घरची परिस्थिती जरी नाजूक असली तरी घरच्यांना शिक्षणाचे महत्व माहित असल्यामुळे ताईंना देखील शाळेत टाकले होते. १९७८ साली ताईंनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण त्या वेळी ५१% गुणांसह पूर्ण केले. त्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या कमीच होती कारण ताईंच्या शाळेत देखील १५ मुलांसोबत शाळेत जाणारी मुलगी त्या एकच होत्या.
१९८२ साली आवनखेड येथील यादवराव वसाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यादवराव हे साखर कारखान्यात नोकरी करत एकत्र कुटुंबात राहत होते. घरच्या शेतीत गहू, हरभरे, ऊस लावलेला होता. लग्नानंतर ताईंना शेतीमधील कामात देखील लक्ष द्यायला लागत होते. माहेरी या सर्व कामांचा अनुभव नसला तरी सासूबाईंकडून शेतीविषयक कामे त्या शिकत गेल्या. त्यातूनच शेतीची आवडदेखील निर्माण झाली. १९९४ साली कुटुंब विभक्त होऊन ५ एकर क्षेत्र वाट्याला आलेले होते. त्यावेळी मुलं लहान होती, पती यादवराव नोकरीस असल्याने कुटुंब आणि शेती दोन्ही जबाबदाऱ्या शारदाताई बघत होत्या. सासूबाईंकडून आलेला शेतीचा हा वारसा त्यांनी पुढे नेला.
यादवराव नोकरीस जरी असले तरी ताईंच्या कामात त्यांची मदत आणि पाठिंबादेखील होता. सर्व काही सुरळीत चालू असताना एका घटनेमुळं हे सर्व चित्रच पालटून गेले. यादवराव हे ट्रॅक्टर घेऊन वजन काट्यावर असताना मागून एका ट्रकची धडक लागून ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन त्यांचे निधन झाले. ताईंच्या आयुष्यातील एक भक्कम आधार त्यांनी या अपघातात गमावला होता. या घटनेमुळे ताईंना नैराश्य आले पण आता सर्व कुटुंबाची जबाबदारी हि त्यांच्यावरच होती. पुढे शेती आणि मुलांना शिकवून मोठं करण्याचं पती यादवराव यांचं स्वप्न ताईंना शांत बसू देत नव्हतं. त्यामुळे आता मुलांसोबत शेतीत देखील प्रगती करून कुटुंबाला पुन्हा उभारी देण्याचा निर्धार करत ताई जिद्दीने उभ्या राहिल्या.
सुरुवातीला ऊसामध्ये पाहिजे तितके उत्पन्न येत नव्हते. भाऊ भाऊसाहेब झोमण यांच्या घरी द्राक्षशेती केली जात त्यांनी ताईंना द्राक्षशेती करण्याचा पर्याय सुचवला. अशा प्रकारे २०११ साली द्राक्षबाग लावली. या द्राक्षबागेसाठी काही कर्ज घेण्यात आले. द्राक्ष पिकातील तितकीशी माहिती त्या वेळी नसल्याने भावाचे बरेच मार्गदर्शन मिळत गेले. सुरुवातीपासूनच ताईंनी द्राक्ष निर्यात करायला सुरुवात केली. सुरुवातीचे २-३ वर्षे द्राक्षपीक त्यांच्यासाठी नवीन असल्याने काही वर्षे गुणवत्तेच्या बाबतीत काही अडचणी आल्या होत्या. दरम्यान मुलगा समाधान हा कृषी पदवीचे शिक्षण घेत होता.
२०१६ साली सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत ते जोडले गेले. या माध्यमातून तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन देखील मिळत गेले. यानंतर पुढे मुलं देखील सोबतीला आले. अशा प्रकारे जसजसे शेतीतून उत्पन्न येत गेले तसे २०१७ ला दीड एकर, २०१९ ला १ एकर त्यानंतर २०२१ ला २ एकर शेती घेत एकूण साडेनऊ एकर क्षेत्र झाले. यात सर्वात महत्वाचे म्हणजे पती यादवराव यांचे मुलांना शिकवून मोठं करण्याचे स्वप्न अखेर ताईंनी पूर्ण केले. मोठा मुलगा समाधान एम.कॉम. आणि कृषी पदवीधर होऊन शेतीचे व्यवस्थापन आता पाहत आहे, सोबतच उत्कृष्ठ कृषी विद्यार्थी म्हणून त्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते.
दुसरा मुलगा सुरेंद्र इंजिनीअर होऊन कंपनीत नोकरीस आहे तर मुलगी उल्काने एम.ए. बीएड पूर्ण केले आहे. सर्व मुलांचे लग्न देखील झाले आहेत. विशेष म्हणजे ताईंच्या दोन्ही सुना वर्षा आणि दिपाली यादेखील उच्चशिक्षित आहेत आणि ह्या दोन्ही सुनादेखील आवडीने आज घरच्या शेतीचे व्यवस्थापन पाहत आहे. ताईंनी त्यांच्या सासूकडून घेतलेला वारसा आज दोन्ही सुना त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे नेत आहेत. आयुष्यातील कठीण प्रसंगांना जिद्दीने तोंड देत शेतीच्या आधारावर कुटुंबाची उभारणी करणार्या शारदाताईंच्या निडर व्यक्तिमत्वास सलाम!