शेती विकू न देता दागिणे गहाण ठेवून
दुप्पट द्राक्षबाग करणाऱ्या
निळवंडीच्या मीना पवार
एकेकाळी दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे शेती विकण्याचा जो निर्णय कुटुंबाने घेतला होता, ती शेती न विकण्याची आपली ठाम भूमिका घेत पुढे पतीच्या जोडीने त्याच शेतीच्या आधारावर संपूर्ण कुटुंबाची सर्व स्वप्ने पूर्ण करणार्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया – मीना नामदेव पवार (निळवंडी ता. दिंडोरी)
आयुष्यातील प्रवासात संकट अनेक आली पण आपल्यासारखे दिवस मुलांनी कधी पाहू नये या विचाराने मीनाताईंनी आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभे राहून शेतीत धैर्य आणि हिमतीच्या जोरावर सकारात्मक बदल घडवून आणला. माहेरी असताना देखील तेथील परिस्थिती हि नाजूकच होती. २००० साली निळवंडी येथील नामदेव पवार यांच्याशी विवाह झाला. त्या वेळी घरी ८ एकर एवढी शेती होते. यातील काही क्षेत्रात द्राक्षबाग उभी करायचे ठरवले. पण द्राक्षबाग उभी करायला हाती काहीच भांडवल नव्हते.
ड्रीप करायला पैसे हाती नसल्याने सोने गहाण ठेवले. प्रसंगी मीना आणि पती नामदेव यांनी दोघांनी मिळून पाइपलाईनच्या चारी खणल्या. झाड मोठे होत असताना अँगल बांधणे गरजेचे होते त्यासाठी साधारण ८०,००० चे कर्ज घेतले. मग त्यानंतर २००३ साली एक एकर मध्ये पहिली द्राक्षबाग लावली. २००४ ला ह्या द्राक्षबागेतून बऱ्यापैकी उत्पन्न आले,जसजसे उत्पन्न येऊ लागले त्यानंतर पुढे २००६ ला ४ एकर बाग वाढविण्याचे ठरवले. भाचेजावई यांच्या मदतीने हाच बाग उभा करण्यासाठी एक कर्ज घेतले. २००९ पर्यंत या बागेतून चांगले उत्पन्न येत होते, पण २००९ मध्ये आलेल्या फयान वादळाचा मोठा फटका बसून जवळपास ६० ते ७० टक्के नुकसान झाले. त्याचवेळी कर्जाचा पहिला हफ्ता देखील भरणे होते, पण या सर्व नुकसानीमुळे हेच कर्ज साधारण २०११ पर्यंत थकत गेलं.
कारण शेतीदेखील ‘ना नफा ना तोटा’ या स्वरूपात चालू होती ज्यातून घर चालवणे आणि बँकेचे हफ्ते भरणे या दोनही गोष्टी शक्य नव्हत्या. मग आता हि सर्व परिस्थिती सुधारवण्यासाठी एखादा जोडधंदा केला पाहिजे या हेतूने एका नातेवाईकांच्या ओळखीने ट्रक घेतला. ह्या ट्रकचा वापर भाजीपाला वाहतुकीसाठी केला. पण यातून उत्पन्न येण्यापेक्षा नुकसानच जास्त होत गेले. दुसरीकडे २०१२ साली दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या अभावी सर्व बाग गळून गेले. मग सर्वात आधी ट्रक विकून टाकली आणि त्यातूनच गाडीचे कर्ज फेडले.
अशा प्रकारे त्या वर्षी द्राक्षबागेतून काहीही उत्पन्न आले नाही. सोबत साधारण २३ लाखांच्या आसपास कर्ज देखील डोक्यावर होतेच. मग हे कर्ज फेडण्यासाठी शेवटी संपूर्ण जमीन विकण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला कारण दुष्काळामुळे जमिनीत देखील कोणते पीक लावणे शक्य नव्हते. पण जमीन विकण्याच्या या निर्णयाला मीनाताईंचा पूर्णपणे विरोध होता. सुदैवाने जमीन विकण्याचा व्यवहार ऐन वेळी मोडण्यात आला. आता याच जमिनीत पुन्हा एकदा बदल घडवून आणण्याचा ध्यास मीनाताई आणि पती नामदेव यांनी घेतला.
मागील द्राक्षबाग दुष्काळात पाणी नसल्यामुळे गेली हे पाहता सर्वप्रथम शेततळे बांधण्याचे ठरवले व त्यासाठी व्याजाने काही पैसे घेतले. साधारण ३ लाखांचे ५% व्याजाने पैसे घेतले. आणि त्याच वर्षी २०१२ साली सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीशी ते जोडले गेले. द्राक्षशेती सुधारविण्यासाठी प्रगतशील शेतकरी रामदास पाटील यांचे मार्गदर्शन मिळत गेले आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार यापूर्वी स्थानिक बाजारपेठेत दिलेली द्राक्षे त्या वर्षी निर्यात करण्याचे ठेवले. उन्हाळ्यातील एप्रिल खरड छाटणीसाठी मजुरांना द्यायला पैसे नसल्याने मीना आणि नामदेव या दोघांनी मिळूनच हि छाटणी केली.
सबकेन, शेंडाबाळी अश्या उन्हाळ्याच्या कामांसाठी ओळखीतील जवळच्या २-३ व्यक्तींना बोलवून या ४-५ लोकांत ते काम पूर्ण केलं. बागेच्या औषधांसाठी एका जवळच्या मित्राने सर्व औषधे पुरवली. योग्य मार्गदर्शन आणि काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर त्या वर्षी ९५% बागाची हार्वेस्टिंग झाली. असे करत ज्या द्राक्षबागेत २०१२ साली चाळीस हजार उत्पन्न निघाले त्याच ५ एकर बागेत २०१३ साली या दांपत्याने तब्बल ३0 लाखांचे उत्पन्न काढले. यातून सर्वप्रथम शेततळ्यासाठी, मित्राकडून औषधासाठी घेतलेल्या मदतीचे पैसे परत केले. २०१४ साली पुन्हा एकदा चांगले नियोजन करत द्राक्षबागेतून ३०-३२ लाखांचे उत्पन्न काढत बँकेचे कर्ज सर्व फेडून टाकले.
२०१३ पासून मजूर, खतांचे नियोजन अशा अनेक जबाबदाऱ्या मीना स्वतःपाहू लागल्या. २०१८ साली स्वतःचे घर बांधले. निसर्गाचे बदल आपल्या हातात नसल्याने शेतीतील चढ-उतार हे येतच असतात. या सगळ्या प्रवासात मध्यंतरी २०१९-२० मध्ये वातावरण बदलांमुळे पाहिजे तसे उत्पन्न आले नाही. २०१९ मध्ये गिरणारे येथे १६ एकर द्राक्षबाग देखील कॉन्ट्रॅक्टवर करायला घेतली होती त्यात सुद्धा वातावरणामुळे थोडे नुकसान झाले पण मागील काळात यासारख्या अनेक संकटांवर खंबीरपणे मात केलेली असल्याने यापुढे येणाऱ्या अडचणींवर उभारी घ्यायला मीना आणि पती नामदेव हे दोघे तयार होते.
सध्या ७ एकर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. या शेतीच्याच आधारावर आज आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.आज मोठी मुलगी वृषाली हि इंजिनिअरिंग, दुसरी मुलगी अश्विनी हि एरोनॉटिक्स मध्ये इंजिनिअरिंग करत असून आपल्या आई-वडिलांना सर्व जगाची भ्रमंती तिला करून आणायची आहे तसेच मुलगा हृतिक विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. एकेकाळी हीच शेती न विकण्याची ताईंची ठाम भूमिका आज त्यांनी सफल करून दाखवली. पतीच्या यांच्या जोडीने खंबीरपणे उभे राहत आयुष्यातील प्रत्येक संकटाला तोंड देणाऱ्या या नवदुर्गेच्या जिद्दीला सलाम!