विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतीय राजकारणातील काही नेते आपल्या फटकळ स्वभावाबद्दल तसेच वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याविषयी देखील असेच म्हणता येईल. सध्या भारतीय जनता पक्षात असलेल्या स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशाच काही मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष वेधले आहे.
भाजप खासदार डॉ.स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून त्यात सांगितले की, सध्या न्यायालयात अनेक राजकीय खटले प्रलंबित आहेत. तसेच त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, पी चिदंबरम रॉबर्ट वाड्रा आणि इतर अनेकांविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला. या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यास विलंब झाल्यामुळे भाजपचा प्रतिमा खराब होत असल्याचे म्हटले आहे. डॉ.सुब्रमण्यम स्वामी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व मानले जातात. हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यानंतर, ते हार्वर्ड विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक सदस्यही राहिले आहेत. भारतातील आणीबाणीच्या काळात संघर्ष, तिबेटमध्ये कैलास-मानसरोवर यात्रा मार्ग उघडण्याचे त्यांचे प्रयत्न, भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा, भारताने इस्रायलची राजकीय स्वीकृती, आर्थिक सुधारणा आणि हिंदू जीर्णोद्धार इत्यादी अनेक कामे केली आहेत. राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून स्वामींनी स्वेच्छेने आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी या पत्रात २ जी घोटाळा, एअरसेल मॅक्सिस आणि नॅशनल हेराल्ड सारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे. तसेच या प्रकरणांचे मूल्यांकन करण्यासाठी आंतरविभागीय देखरेख संस्था स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर स्वामींनी आरोप केला की, वड्रा यांच्याविरोधात नोंदवलेल्या काळ्या पैशाच्या प्रकरणातही काहीही भरीव घडले नाही.
स्वामी यांनी दि. २ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांना सदर पत्र लिहिले आहे. तसेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी मोदींना लिहिलेले हे दोन पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिले की, केंद्रातील यूपीएच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या अशा अनेक खटल्यांच्या सुनावणीत केंद्र सरकारकडून मोठा विलंब झाला आहे यात शंका नाही. त्यामुळे मोदी सरकारची तसेच भाजपची प्रतिमा मलिन होत आहे असे त्यांनी म्हटले.