इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या वैद्यकीय शिक्षण संस्थेला मान्यता नसेल तर या संस्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नव्हे तर संपूर्ण भवितव्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी चक्क इच्छामरणाचा तथा आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये NEET उत्तीर्ण झाल्यानंतर सहारनपूरच्या ग्लोकल मेडिकल कॉलेजमध्ये ६६ विद्यार्थ्यांनी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र तीन महिन्यांनंतर, एमसीआयने मान्यता रद्द केली. परंतु याबाबत विद्यार्थ्यांना माहिती न देता महाविद्यालय प्रशासनाने पाच वर्षे अभ्यास सुरूच ठेवला. विद्यार्थ्यांनी अधिकारी व शासनाकडे चकरा मारल्या, मात्र विद्यार्थ्यांना मार्ग निघत नव्हता. त्यामुळे १२ विद्यार्थ्यांनी इच्छामरणाची मागणी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नगर दंडाधिकारी विवेक चतुर्वेदी यांना राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन सादर केले.
याबाबत कुलगुरू म्हणाले की, विद्यापीठाला अजूनही विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय महाविद्यालयाची ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. नंतर न्यायालयातही गेले. यासंदर्भात रिट याचिकाही दाखल करण्यात आली होती. तेही रद्द करण्यात आले आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे.