इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षिका रागवल्याने विद्यार्थ्याने चक्क महिला शिक्षकेचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर अश्लिल फोटो, व्हिडीओ आणि शिक्षकेचा मोबईल क्रमाक टाकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी तांत्रिक तपास करीत बारावी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.
महिला शिक्षिकेला अचानक अनोळखी क्रमांकावरून अश्लिल फोन कॉल्स सुरू झाल्याने शिक्षिकेच्या पायाखालची वाळू सरकली. याबाबत बोलताना दिल्ली पोलिस दलातील पोलीस उपायुक्त शंकर चोधरी यांनी सांगितले की, शहरातील शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेतील हा प्रकार असून, मुलाच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर सेलचे निरीक्षक जगदीश कुमार यांनी तपास सुरू करीत अल्पवयीन मुलापर्यंतच माग काढला. पिडीत शिक्षिका ही ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाची वर्गशिक्षिका आहे. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षिका सतत अपमान करीत असल्याची भावना मुलाच्या मनात तयार झाली. याचा सूड घेण्यासाठी त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. शिक्षिकेचा फोटो, इतर अश्लिल फोटो व व्हिडीओ तसेच शिक्षिकेचा मोबाईल क्रमांक असा मजकूर टाकून त्याने हे अकाउंट सुरू केले होते. अखेर आता विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहे.