मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, या मागणीसाठी आंदोलन करण्याचे सोशल मीडियावरून आवाहन करणाऱ्या विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीखोर व्हिडिओमुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करून त्या ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी करत राज्यात सोमवारी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विकास फाटक याने चिथावणी दिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचा आरोप आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील निवासस्थानाला विद्यार्थ्यांनी घेराव केला होता. शेकडो विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
हिंदुस्थानी भाऊ याचे खरे नाव विकास फाटक आहे. सोशल मीडियावर फाटक याला हिंदुस्थानी भाऊ या नावाने ओळखले जाते. विकास फाटक यूट्यूबवर पाकिस्तानविरोधात अश्लील आणि प्रक्षोभक व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याला मोठी फॅन फोलोअर आहे. बिग बॉस सिझन १३ मध्येसुद्धा विकास फाटक याने सहभाग घेतला होता. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला या सिझनमधील विजेता ठरला होता. सिद्धार्थ शुक्ला याचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.