इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांना पाळणाघरात ठेवणे हे अलीकडे कॉमन आहे. त्याच्याच पुढची पायरी म्हणजे मुलांना शाळेत न्यायला आणि आणायला स्कुल बस अर्थात शाळेच्या बसची सोय करणे. अनेकदा मोठ्या शाळांच्या नादात घरापासून लांब शाळेत मुलांना घातले जाते. आणि मग स्कूल बस अपरिहार्य होते. मात्र, या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच गाड्या चालवणाऱ्या चालकांवर लक्ष ठेवले नाही तर काय होऊ शकते, याचीच जाणीव सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ करून देतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही श्वास अडकल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये?
एक लहान शाळकरी चिमुकला आपल्या बसमधून घरी जात असतो. आपला स्टॉप आल्याने मुलगा उतरायच्या तयारीत असतो. बस स्टॉप आल्यावर बस तेथे थांबते. चिमुकला आपलं दप्तर घेऊन खाली उतरतो. मात्र, तो व्यवस्थित उतरला आहे की नाही याची खातरजमा न करताच बसचे दार बंद होते आणि बसही सुरू होते. इथे मात्र बसचे दार बंद होताच चिमुकल्याची बॅग बसच्या दारात अडकते. बॅग आतमध्ये आडकल्याने चिमुकला देखील आतमध्ये फसतो. आणि यातल्या कोणत्याच गोष्टीची कल्पना चालकाला येत नाही. बस सुरू होते आणि तब्बल १००० फुटांपर्यंत पुढे जाते. आणि आपली बॅग आत अडकलेला मुलगा रस्त्यावर फरफटत जातो.
सतर्कता गरजेची
हा व्हिडीओ जुना म्हणजेच २०१५ मधील आहे. आणि तो भारतातील नाही. @crazyclipsonly या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. चिमुकला आतमध्ये अडकून फरफटत असल्याचं बसमध्येच बसलेल्या एका महिलेच्या लक्षात येतं. त्यावेळी तातडीने बस थांबवून चिमुकल्याला रुग्णालयात नेलं जातं.
पालकांनो, मुलांकडे लक्ष ठेवा
मुलांसोबत अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी जागरूक असायला हवे. जर बस स्टॉपवर मुलाला कोणी घ्यायला आले असते, तर हा अपघात टळला असता, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. तसेच वाहनचालकांनी देखील लहान मुलांना बसमधून घेऊन जाताना योग्य काळजी घेतली पाहिजे, अशा कमेंटही नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.
Student Stuck in School bus video viral