मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांकडून जीएसटी वसुली करणाऱ्या पण, सरकारला न भरणाऱ्या संचालकाचा भांडाफोड झाला आहे. याद्वारे संचालकाने तब्बल १४ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केली आहे. याप्रकरणी अखेर क्लास संचालकाला अटक करण्यात आली आहे.
गोपानीयरित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग – आठ(VIII) , च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते, या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर १८ टक्के जीएसटी कर(GST) वसूल केल्याचा संशय आहे, परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशा प्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्क कंपनीच्या बाजूने गैरवापर केले गेले असे मानले जाते.
याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत कलम 132(1)(d) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी, (CGST) कायद्याच्या कलम 132(1)(i) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीत शोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून यामुळे कर चोरी करणार्यांवर आळा बसेल.
Student GST 14 Crore Fraud Coaching Class Director Arrested