कोलकाता – गेली दोन वर्ष कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेले आहेत. अशा परिस्थितीतही काही कंपन्या उच्चशिक्षित तरुणांना नोकरीची संधी देत आहेत, इतकेच नव्हे तर चांगले पॅकेज ऑफर करत आहेत. सध्याच्या कोरोना महामारीची परिस्थिती असूनही, आयआयटी -खरगपूरला मोठ्या प्रमाणात प्री-प्लेसमेंट ऑफर प्राप्त झाल्या आहेत, भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वाधिक ऑफर या संस्थेतील तरूणांना मिळाल्या आहेत. आयआयटी खरगपूरमधील १६०० तरुणांना गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एका निवेदनात म्हटले आहे की, आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याला वार्षिक २.४ कोटी रुपयांचे वेतन पॅकेज मिळाले आहे. दोन कोटींच्या पॅकेजमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यासोबतच २० हून अधिक विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-खड़गपूरने या वर्षी आयआयटीच्या इतिहासात सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर नोंदवल्या आहेत. आयआयटी प्लेसमेंट २०२१ मध्ये खरगपूरने देशातील इतर सर्व आयआयटी ला मागे टाकले आहे. प्लेसमेंट सीझनच्या केवळ १० दिवसांमध्ये २२ हून अधिक विद्यार्थ्यांना ९ लाख ते २.४ कोटी रुपयांच्या ऑफर मिळाल्या. यापैकी १० हून अधिक ऑफर देशांतर्गत कंपन्यांच्या आहेत.
आयआयटी खरगपूरमध्ये भरती करणाऱ्या मुख्य कंपन्यांमध्ये क्वालकॉम, मायक्रोसॉफ्ट, गुगल, उबर, इंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, हनीवेल, सॅमसंग, आयबीएम इत्यादींचा समावेश आहे. सदर प्लेसमेंट सत्र तीन दिवस चालले असून सॉफ्टवेअर, अॅनालिटिक्स, कन्सल्टिंग, कोअर इंजिनीअरिंग, बँकिंग, फायनान्स या सर्व क्षेत्रातील १०० हून अधिक कंपन्यांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला.