इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – द्वारका पीठ आणि बद्रीनाथच्या ज्योतिष मठासाठी आता स्वतंत्र श्रीशंकराचार्यांची घोषणा झाली आहे. जगद्गुरु शंकराचार्य श्रीस्वामी स्वरूपानंद सरस्वती ( ९९ ) यांच्या भू-समाधी सोहळ्यात सोमवारी त्यांच्या या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. व्दारकेतील शारदा पीठावर (पश्चिमान्माय) श्रीशंकराचार्य म्हणून स्वामी सदानंद सरस्वती यांची नियुक्ती करण्यात आली, तर ज्योतिष मठाचे श्रीशंकराचार्य म्हणून काशीचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती कार्यभार सांभाळतील. हे पीठ उत्तराम्नाय म्हणून ओळखले जाते.
दोन्हीही नूतन शंकराचार्य हे पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य असून त्यांचा ‘पीठ-अभिषेक’ सोहळा नवरात्र काळात होईल. स्वामी स्वरूपानंद हे व्दारकापीठाचे शंकराचार्य होते. त्याचवेळी गेली चाळीस वर्षे ज्योतिष मठाचा कारभार तेच सांभाळत होते. त्यांच्या निधनानंतर आता या पीठांना स्वतंत्र शंकराचार्य लाभणार आहेत.
विद्यार्थी नेता ते शंकराचार्य
उत्तर प्रदेशातील प्रतापगडला जन्मलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद (५२) यांचे वाराणसीशी विशेष नाते आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव उमाशंकर पांडे. धर्मसम्राट स्वामी करपात्रीजी महाराजांचे शिष्य ब्रह्मचारी श्रीरामचैतन्य यांच्या सान्निध्यात त्यांनी गुजरातमध्ये संस्कृत अध्ययनाला प्रारंभ केला. पुढे त्यांच्याच समवेत ते काशीला पू. करपात्रीजी यांच्या सेवेत आले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्याकडून दीक्षा आणि त्यांच्याच कडून १५ एप्रिल २००३ ला दंडी संन्यास दीक्षा घेतली. सध्या काशीतील श्रीविद्यामठाचे ते प्रमुख आहेत. काशीतील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून त्यांनी शास्त्री आणि आचार्य पदवी संपादन केली. महाविद्यालयीन काळात ते विद्यार्थी नेते म्हणून प्रसिद्ध होते. जनरल सेक्रेटरी म्हणून अनेक विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले.
काशीतील वादग्रस्त ज्ञानवापीमध्ये असलेल्या आदि विश्वनाथाच्या पूजेचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण केले आहे. गंगा बचाव, मंदिर बचाव आंदोलनातही ते सक्रीय आहेत. धार्मिक नेत्याने समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे, असे मत ते हिरीरीने मांडत असतात. त्यांचे शैव आणि वैष्णव आखाड्यातील श्रीमहंतांशी विशेष सलोख्याचे संबंध आहेत. जगातील हिंदूधर्मियांची सर्वोच्च संस्था, ‘हिंदू धर्म आचार्य सभेचे’ ते सन्माननीय पदाधिकारी आहेत.
श्रीविद्येचे उपासक स्वामी सदानंद
व्दारका पीठाचे नूतन श्रीशंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्याच्या बरगी गावात झाला. त्यांचे पूर्वायुष्यातील नाव रमेश अवस्थी. त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ब्रह्मचारी दीक्षा घेतली. पुढे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांना वाराणसीत दंडी संन्यास दीक्षा दिली. शंकराचार्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष ते व्दारका शारदापीठाचा कारभार पाहात आहेत. सौम्य स्वभावाचे स्वामी सदानंद हे श्रीविद्येचे गंभीर साधक आहेत. त्यांनी श्रीविद्येवर अनेक संशोधनपर ग्रंथ लिहिले आहेत.
Student Activist To ShreeShankaracharya New Appointments