सातारा – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता दि.24 मेच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी काढले आहेत. शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दोन दिवसापुर्वीच सांगून कडक लॉकडाऊन केला आहे. दि.24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करा अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसीलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे आदींची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी प्रतिरोज 1800 ते 1900 चे पुढे कोरोनाबाधित होत आहेत. पाटण तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. तरीही आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी काढले आहेत. त्यांची महसूल आणि पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करावी. जेणेकरुन पाटण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणखीन कमी होण्यास मदत होईल. पोलीस विभागाने पहिले दोन दिवस अतिशय कडक भूमिका घ्यावी. म्हणजे लोक घराबाहेर पडणार नाहीत. विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई करा. तसेच तालुक्यातील ज्या गावामध्ये कोरोनारुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावातील ग्रामस्थांच्या महसूल पोलीस विभागाने बैठका घेऊन बाधित लोकांना गृह विलगीकरण करावे व घरातच उपचार घ्यावेत अशा सुचना करा. पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांकरिता आवश्यक असणारी सर्व यंत्रणा आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी कोरोना उपचार केंद्रामध्ये उपलब्ध करुन दिली आहे. आवश्यक असणारा औषध साठा तसेच ऑक्सिजनचा साठाही चांगल्या प्रमाणात आहे. परंतू वाढणारी ही कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहावयास मिळेल. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता प्रशासन आपले काम करीत आहे परंतू नागरिकांनी ही अशा कठीण परिस्थितीत घरी थांबून आपल्या कुटुंबाची काळजी घेत या संकटावर मात करावी. व पाटण तालुक्यात ऑक्सिजन बेड अभावी कुणाची गैरसोय होत नाही, असे आवाहनही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी या बैठकीत केले.
पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे 136 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत.दौलतनगर 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 याप्रमाणे 75 बेड वाढीवचे तर 11 बेड व्हेन्टिलेटरचे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड अभावी कुणाची गैरसोय होत नाही ही चांगली बाब आहे.असेही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.