विशेष प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतू गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून १२ मे रोजी दुपारी १२ पासून २३ मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोना विरूद्धची जिंकण्याचा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात १२ मेपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कोरोना बाधितांच्या संख्यापेक्षा आताच्या परिस्थितीत बाधितांची संख्येत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्यात व जिल्ह्यात अंशत: कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अनेक कारखानदार, बांधकाम व्यावसायिक यांनी तेथे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच व्यवस्था करून त्यांच्या लसीकरणाची देखील सोय करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी कारखान्यांचे मालक व बांधकाम व्यावसायिक यांना सूचित केले आहे.
त्याचप्रमाणे या लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे नुकसान होऊ नये आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल याबाबत बाजार समित्यांनी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
अशंत: कडक निर्बंध लागू करण्यात आलेल्या काळात जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. याअंतर्गत ऑक्सिजन पुरवठा, बेडस् उपलब्धता, औषधसाठा, मनुष्यबळ यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यात सुरळीत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने २९ ठिकाणी ऑक्सिजन निर्मीती केंद्र येत्या महिनाभरात सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून दिली आहे.
आजच्या परिस्थितीत कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांना अधिक धोका असल्याचे वर्तविण्यात येत असल्याने त्यासाठी लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार कक्षांची निर्मीती करण्यात येत असून बालरोगतज्ज्ञांच्या बैठका घेवून नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याभर नियोजन करण्यात येत आहे. परंतू लसीकरणाबाबत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज असल्याने आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचार विषयी जागृती होवून आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तेथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिली आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी जनतेने पूर्ण सहकार्य करून १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केले आहे.