पुणे – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात मात्र कोरोना संसर्ग कायम असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात दररोज एक हजारापेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून ये आहेत. याची गंभीर दखल सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळेच सांगलीत उद्यापासून (बुधवार १४ जुलै) कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. येत्या १९ जुलैपर्यंत सांगलीत कडक लॉकडाऊन असणार आहे. या आदेशानुसार, रस्त्यावरील खाद्य पदार्थ, भाजीपाला विक्री, फेरीवाले, चहा विक्री या साऱ्यांनाच बंदी घालण्यात आली आहे. तसेच, विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. शिवाय विवाह आणि निधन व अन्य कार्यक्रमांना मोजक्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.