नाशिक : गाव आणि गाव शिवारातील पथदीपांची वीजबिले पूर्वीसारखेच शासनाने भरावे, यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. विद्युत मंडळाने बळजबरी केल्यास वीजप्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. या विषयाची तड लावण्यासाठी शासनाकडे सततचा पाठपुरावा सुरु आहे. पाठपुराव्यावर शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील गावांमधील आणि गाव शिवारातील स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा खंडित करु नये, अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
गाव आणि गाव परिसरातील स्ट्रीट लाईटचे बिले गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या जिल्हा परिषद विभागाकडून वीज मंडळाकडे वर्ग होत असे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शासनाने एक परिपत्रक काढून गाव आणि गाव परिसरातील स्ट्रीट लाईटचे बिले ग्रामपंचायतीने भरण्याचा निर्णय जाहिर केला होता. शासनाच्या या निणर्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. सदर बिलांच्या रक्कमेचा बोजा ग्रामपंचायतीवर न ठेवता शासनानेच भरावे, असा सुर शेकडो गावातील गावकऱ्यांमध्ये आहे. अशातच दोन महिन्यांपासून महावितरण प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने आता जिल्हा वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
जिल्हावासियांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत खासदार गोडसे यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड आणि महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुमारे दीड वर्षांपासून कोरोना संसर्ग आजाराचा उद्रेक सुरु असल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांना मोठ्या आर्थीक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच गाव आणि गाव शिवारातील स्ट्रीट लाईटच्या बिलांसाठी महावितरणकडून तगादा सुरु आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेवून बिलांच्या रक्कमेसाठी महावितरणने वीज खंडीत करण्याची कारवाई केल्यास मोठा संघर्ष होण्याची भिती खा. गोडसे यांनी व्यक्त केली. यापूर्वी सारखेच गाव आणि गाव परिसरातील स्ट्रीट लाईटचे बिले शासनानेच भरावे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरु आहे. या पाठपुराव्यावर जोपर्यन्त निर्णय होत नाही तोपर्यन्त महावितरणने कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करुन नये, अशा सूचना यावेळी खासदार गोडसे यांनी केल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोले यांच्यासह सरपंच परिषदेचे राज्य समन्वयक अनिल ढिकले, जिल्हाध्यक्ष तान्हाजी गायकर, सदानंद नवले, तालुकाध्यक्ष दत्तुदादा ढगे, सुनील कडाळे, नवनाथ गायधनी, बाळासाहेब म्हस्के, सागर जाधव, गोरख जाधव, रमेश खांडबहाले, दिलीप गायधनी, सुभाष पारधी, त्र्यंबक पगार, दीपक हागवणे, भाऊसाहेब म्हैसधुणे, प्रदीप मोहिते, सचिन जगताप, आत्माराम दाते, विकास जाधव, भास्कर थोरात, अलका झोंबाळ, सुवर्णाताई दोंदे, अरुण खांडबहाले, मधुकर ढिकले, विष्णूदादा पेखळे, भरत पिंगळे, विनोद गोडसे, सुरेश पिंगळे, ज्ञानेश्वर शिंदे, काळू आडके आदी सरपंच मोठ्यासंख्येने उपस्थित होते.