डॉ. उज्वला सुधीर उल्हे, नाशिक
आज माझी लग्नानंतरची पहिलीच दिवाळी असल्यामुळे सकाळपासूनच कामाची लगबग चालली होती. प्रत्येक कामाच्या वेळी आईची फार आठवण येत होती. आई सतत रागावून सुद्धा मी कधीही कुठल्या पूजेमध्ये किंवा दिवाळीच्या कुठल्याही गोष्टी मध्ये कधीही रस घेतला नाही. त्यामुळे आज सकाळपासून आईला दहा तरी फोन झाले असतील. प्रत्येक गोष्ट विचारत होती. आई, बाबा त्याच बरोबर माझी लहान बहीण शरयू असे तिघेही मला प्रत्येक गोष्ट सांगत होते. मध्येच आईचे रागवणे पण चालू होते. आता शरयू सगळ्या गोष्टीमध्ये निपूण झाली होती व मला का नाही, मी का अलिप्त राहिली याचा मला राग येत होता. पण काय आहे की, आई बाबांना लग्नांनंतर जवळपास आठ वर्षाने मी झाले होते, त्यामुळे आजोबा आजीची लाडकी बाहुली होते, नुसते बाहुलीच नव्हते तर शरीराने पण फार नाजूक होते. त्यामुळे खूप लाडोबा
झाले होते. त्यात पुढे शाळेत गेल्यानंतर अभ्यासात हुशार म्हणून पण सर्वांच्याकडून कौतुक.
त्यामुळे घर, काम, या गोष्टी पासून दूर राहिले. शरयू मात्र घर, अभ्यास, काम सगळी कडे माझ्या पुढे. माझे शिक्षण होत असतानांच कॅम्पस मधून माझे एका मोठ्या नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी पदावर नियुक्ती झाली. मग गावापासून, घरापासून, आई बाबा पासून लांब, साडे तीनशे किलोमीटर लांब असलेल्या मोठ्या शहरात राहायला लागले. घरातील कामासाठी एक मावशी आहेत, त्या सर्व कामे करून देतात. मागच्या वर्षी माझे लग्न झाले. माझा नवरा अभिनव, खूप सुंदर, सालस व हुशार आहे. तो पण एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी पदावर काम करतो. तो कामासाठी वेडा आहे. त्याचे एका वर्षांमध्ये तीन प्रमोशन झाले आहेत. आज सुद्धा दिवाळी असून तो बंगलोरला गेला आहे. तो काल रात्री कंपनीतून अकरा वाजता घरी आला व लगेचच मला उद्यासाठी बॅग भरायला सांगितली.
आपली पहिली दिवाळी आहे, तू कसे करशील? यावर त्याने साधी विचारणा सुद्धा केली नाही. नेहमी माझी कंपनी, काम, पदोन्नती, परदेश वारी, पगार यावर तो बोलत असतो. आम्ही या एक वर्षांमध्ये सुटीमध्ये कुठेही फिरायला गेलो नाही. आतापर्यंत त्याचे काही फारसे वाटत
नव्हते, कारण मी पण ऑफिसच्या कामामध्ये गर्क होते. पण आज फार वाईट वाटले. सासू बाईंच्या पायाच्या दुखण्यामुळे सासऱ्यांनी येण्याचे वेळेवर रद्द केले, तसेच वेळेवर दिवाळीच्या गर्दीमुळे मला रेल्वेचे आरक्षण मिळाले नसल्यामुळे मलाही त्यांच्याकडे जाता आले नाही.
एवढ्या महत्वाच्या दिवशी मी घरात एकटी, मनच लागेना. खुप रडावेसे वाटत होते. तेवढ्यात अभिनव चा फोन आला. तो माझी माफी मागत होता. त्यानी सांगितल्या प्रमाणे तो दुसऱ्या दिवशी परत आला. आमच्या दोघांच्या सुट्या पण संपल्या होत्या. मी कंपनीत गेले. संध्याकाळी
जेव्हा मी घरी आले तेव्हा आज कधी नव्हे तर अभि लवकर घरी आला होता व त्याच्या हातात लिफाफा होता. तो खूप खुश होता. माझ्या बाबांनी ते पाठवले होते. मी लग्नाआधी अमेरिकेतील एका कोर्स साठी फार्म भरला होता, बाकी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पुर्तता पण झाली होती, पण त्यापुढे त्यांचा काही पत्र व्यवहार झाला नाही. मी पण विसरून गेले. त्याचे काल उत्तर आले. तो दोन वर्षाचा कोर्स होता, मी अभिला सांगितले की, मी जाणार नाही. त्यानी मला खूप समजावले की, संसार चालूच राहणार आहे, मला जर अशी संधी मिळाली तर मी लगेचच स्वीकारेल, म्हणूनच मी तुलाही आग्रह करतो की, तू हे स्वीकारावे. त्यानी माझे लागणारे सर्व कागदपत्रे त्या विद्यापीठाकडे पाठवून दिले. यावेळी आई-बाबा, सासू -सासरे यांनी माझे मन वळते केले. मला रुजू होण्याचे पत्र आले. त्यानी सर्व तयारी करून दिली व मी निघाले सुद्धा. दोन वर्षाचा तो काळ मला जरा जडच गेला. पण तो मला खूप समजावून सांगत होता. आता नाही म्हणता म्हणता हा दोन वर्षाचा काळ निघून जाईल बघ. मी तो कोर्स खूप चांगल्या मार्कांनी पास झाले. तिथल्या लोकांशी इतके छान संबंध तयार झाले होते की, प्रत्येक जण मला भेटायला येऊन गेले.
मी तो कोर्स करून परत भारतात येण्यासाठी निघाले तेव्हा इतके खुश होते की, आज मी चक्क दोन वर्षानंतर अभिला व माझ्या लोकांना भेटणार. विमानातून उतरले तर मला घ्यायला कोणीच नाही, मन खट्टू झाले तर मॅसेज बॉक्स मध्ये मॅसेज आला होता अभिचा की, कंपनीच्या काही महत्वाच्या कामा करिता मला बाहेर गावी जावे लागले व माफीचा इमोजी काढला होता. मला ते वाचून तिथेच मटकन खाली बसावे व घरी जाऊच नये असे वाटले. कशी बशी घरी पोहचले. श्रमापेक्षा मनाने आज खूप थकले होते, कुठेतरी मन खट्टू झाले होते. रात्री केव्हातरी तो येऊन पोहचला. दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये जायच्या गडबडीत त्याच्याशी काही बोलणेही झाले नाही. मला पण दोन दिवसात कंपनीमध्ये रुजू व्हायचे होते.
असा माझा हा एकटीचा संसार चालू होता. अभिनव ला फक्त कंपनी, काम, मिटींग्स, प्रमोशन या गोष्टींचे वेध लागले होते. कुठल्याही विषयावर बोलायला गेले तर नंतर होईल ग, आपण नंतर पण करू शकतो, पण ही संधी परत येणार नाही, हे त्याचे ठरलेले वाक्य होते. याच्या या वागण्याला त्याचे आईवडील सुद्धा कंटाळले होते. कुणाकडे जाणे नको, लग्न नको, कार्यक्रम नको, कुणाला घरी बोलावणे नको. आता मला त्याच्या या गोष्टीचा राग यायला लागला होता. मला पण प्रमोशन मिळाले होते व पगारात पण गलेलठ्ठ वाढ झाली होती. त्याला म्हंटले की, आता आपण घर सजवू या. आपल्याला आता बाळाचा पण विचार करावा लागेल कारण मी तिशीच्या जवळ आले होते. तर त्याचे तेच पालुपद, आपण ते केव्हाही करू शकतो. मी त्याला खूप समजावून सांगायचा प्रयत्न करीत होते, अरे शरीराशी निगडित या गोष्टी वेळ गेल्यानंतर आपण काही नाही करू शकणार. पण त्याची ती नेहमीची उडवा उडवीची उत्तरे तो देत होता. लग्नाला
चार वर्ष झाली, आता मला पण मनापासून वाटायला लागले होते, आता मला पण सर्वजण विचारू लागले होते, पण तो काही ऐकायचा नाही. यावर्षी ठरवले की खूप मजेत दिवाळी साजरी करायची, कारण लग्न झाल्या पासून आम्ही दोघांनी एकत्र अशी दिवाळीच साजरी केली नव्हती. त्याला पण सुटी घ्यायला सांगितले . पण त्यानी सांगितले की, मी आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल, मलाई कुणीतरी तिसराच खाईल. आता सुटी घेतली तर पगारवाढ व प्रमोशन हातचे चालले जाईन, हे ऐकल्यावर मी आता कोलमडून जाईल की काय असे मला वाटायला लागले. आणि काही जरी बोलले तरी मी रडून देईल असे आता वाटायला लागले होते. आज दुपारी मी मेस मध्ये सुद्धा जेवायला गेली नाही, थोडे बरे वाटत नव्हते. ॲसिडिटी सारखे वाटत होते. मी अभिला याची कल्पना देण्यासाठी फोन केला पण मिटींग् मध्ये
असल्यामुळे त्यानी तो घेतला नाही. मला बसवले जात नव्हते शेवटी घरी जायचा निर्णय घेतला. तसेच घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी पण तो त्रास सुरूच होता.
पण आज दिवाळी असल्यामुळे मला असे झोपून राहणे शक्य नव्हते. आज पण तो कामावर गेला. मला म्हणाला मला यायला उशीर होईल डॉक्टरांकडे जाऊन ये. अजून फक्त दोन वर्ष मग मी बघ कुठे असेल. मी फक्त बघत राहिले त्याच्या कडे, हा कुठल्या पद्धतीचा माणूस आहे. इच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षी असावे पण किती ! त्यालाही काही मर्यादा असते. आपण रात्री सविस्तर बोलू, असा म्हणून कंपनीमध्ये निघून गेला. मला खूप भडभडून आले. कसा हा माणूस आहे. कुठल्या रक्ताचा बनला आहे. तरी मी स्वतः ला सावरले. आईशी बोलले, आईला काय त्रास होतो ते सांगितले तर आई गालातल्या गालात हसल्याचा मला भास झाला. मला म्हंटली डॉक्टरांकडून आली की फोन कर, नाहीतर उद्या मीच येते तुझ्याकडे. मी फोन करते असे सांगितले, सर्व आवरून डॉक्टरांकडे गेली. तिने मला तपासले व म्हणाली की, आनंदाची बातमी आहे, तू आई होणार आहेस! तेव्हा काळजी करू नकोस तर स्वतःला जप. एक क्षण खूप आनंद झाला.
पण रात्रीचे अभी सोबतचे संभाषण आठवले, आता मला मूल नको आहे, मी कुठलीही जबाबदारी घेऊ शकत नाही, कारण या प्रमोशन नंतर कदाचित मला दोन वर्षासाठी अमेरिकेला सुद्धा जावे लागेल. तेव्हा मला ही चालून आलेली संधी मी जाऊ देणार नाही. तेथे तू भावनिक होऊन निर्णय घेण्यापेक्षा, माझी परिस्थिती समजून घे. ते आठवले व माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाहेर आले पण आज घरी जायची मुळीच इच्छा होत नव्हती. माझ्याकडे माझी मैत्रीण ऋतुजच्या घरची चावी होती. ती दुसरीकडे बदलून गेल्या पासून तिचे घर खालीच होते. मी माझी गाडी तिच्या घराकडे वळवली. घरात खूप धूळ साचली होती. त्यात एकटी मी घरात, भयाण वाटत होतं. मी तशीच सोफ्यावर बसले व खूप खूप रडले. असा किती वेळ निघून गेला कळलेच नाही. भानावर आली ती बाहेरच्या फटाक्यांच्या आवाजाने, दिवेलागण झाली होती. पण मला उठायची शक्तीच नाहीशी झाल्यासारखे वाटले. कॉफी सुद्धा घ्यायची इच्छा होत नव्हती.
डॉक्टरांकडे मी माझा फोन म्यूट केला होता. त्यावर अभिनवचे सात मिसकॉल दिसले. पण मी त्याला फोन केला नाही. अचानक मनाने ठरवले की, नुसते पद, मान, पैसा याच्यामागे धावणाऱ्या माणसाकडे न जाता कायमचे या शहरातून निघून जायचे म्हणून सोफ्यावरून जाण्यासाठी उठणार, तेवढ्यातच दाराची बेल वाजली, मनात म्हंटले, इथे कोण आले असेल, घर तर बंद असते. अशा विचारात असतांनाच दरवाजा उघडला तर अभिनव घाबरलेल्या स्थितीत उभा होता. मला काही कळायच्या आत त्यानी मला जवळ घेतले, मी रडत होते व तो मला समजावत होता असा खूप वेळ निघून गेला. त्याला माझ्या मैत्रिणी कडून सर्व समजले होते. जेव्हा मी फोन घेत नव्हते, तेव्हा तो खूप घाबरला व त्यानी मी कुठे असणार याचा अंदाज बांधून तो मला इथे शोधायला आला होता. माझी फाईल समोरच
पडली होती, ती त्यानी बघितली आणि तो आनंदाने नाचायला लागला. मला समजे ना याला काय झाले ते. मग त्यानी सांगितले की, रात्रीच्या आपल्या चर्चेवर मी खूप विचार केला, मला तू हवी आहेस. तुझ्या वागण्यातील बदल मला समजत होता. मी खूप स्वार्थी माणसासारखा वागत होतो. मला तुझे मन समजून घेता येत नव्हते. पण आज तू फोन घेत नव्हतीस तेव्हा मनातून मी खूप घाबरला होतो.
त्याच क्षणी एक विचार मनात तरळून गेला की, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. मला सर्व पाहिजे पण त्यातून मिळणाऱ्या आनंदांत मला तुही सहभागी हवी आहेस, तूच नसशील तर या सर्व यशाचे व ऐश्वर्याचे करायचे काय? आज तू मला अस्तित्वाची जाणीव करून दिलीस. मला आज जी ऑफर मिळाली ती मी नाही स्वीकारली. कारण मला तुझ्यासोबत राहायचे आहे. तेव्हा आता या बाळाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करायचे आहे. तेव्हा चल आपण बाळाच्या दोन्ही आजोबा आजीला ही आनंदाची बातमी देऊ या. नवीन दिवे घेऊ या. आज मला खूप मोकळं मोकळं वाटतंय. त्याच्या या रुपाकडे मी बघतच राहिले. दहा मिनिटांपूर्वी मी याला सोडून जाणार होते. मला पण खूप आनंद झाला, आज माझा नव्याने जन्म झाला होता. माझ्या या अजून जन्म न घेतलेल्या बाळाने माझे अस्तिव जागं केलं होत. आज मी, मी झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते व मी ते थांबावे म्हणून कुठलेही प्रयत्न करीत नव्हती. कारण ते आनंदाश्रू होते, माझ्यातील स्वयत्वाचा आज नव्याने जन्म झाला होता…..
या ठिकाणी भाऊसाहेब पाटणकर यांच्या ओळी मला आठवल्या….
रोखले नयनात आसू, मी शब्द ओठी रोखले,
पहिले नाही तिला, मी नजरेस माझ्या रोखले,
सांगूच का या संयमाला, मी आज का सोसला?
होती मला जाणीव, मजला इन्कार नस्ता सोसला..
कथेचे नावं – आज मी नव्याने जन्मले……
लेखिकेचे नावं – डॉ. उज्वला सुधीर उल्हे
मो. नं. ९०११८२४९८८ , मेल आयडी – drujwalaulhe@gmail.com