नाशिक – जोरदार वा-यासह आलेल्या तौक्ते निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विदुयत यंत्रणेचे नुकसान झाले असून असून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी बहुतांश भाग तात्काळ सुरु करण्यात आला तर अनेक भाग सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. वाऱ्याची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे.
वादळाच्या फटक्यामुळे नाशिक जिल्ह्यात ४० वीज उपकेंद्र प्रभावित झाले होते त्यापैकी २७ उपकेंद्र सुरु करण्यात आले. ३५४ वीज वाहिन्या बंद पडल्या त्यापैकी १७१ सुरु झाल्या आहेत. १४,०६३ रोहित्रे बंद झाली होती, त्यापैकी ७, ३१३ रोहित्रे सुरु करण्यात आली. उच्च व लघुदाबाचे एकूण १६३ खांब प्रभावित झाले त्यापैकी ६७ सुरळीत करण्यात आले. उर्वरित बंद असलेली यंत्रणा सुद्धा पूर्ववत करण्याचे कार्य युद्धस्तरावर गतीने सुरु आहे. वृत्त लिहेस्तोवर उर्वरित बंद असलेला बहुतांश भाग सुरु करण्यात आला होता.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे सुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. वादळी वाऱ्यात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे जनमित्र व कंत्राटदाराचे कामगार कार्यरत आहेत.ध्या कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणची यंत्रणा सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महावितरण सतर्क असून बंद झालेला पुरवठा तात्काळ सुरु करण्यासाठी कार्यरत आहे.
नाशिक जिल्ह्यात व शहरात ‘ वादळामुळे वीजयंत्रणेला फटका बसला, वीजयंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्यानेअनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. तसेच अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला होता. चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे नुकसान झाले असून हे चक्री वादळ राज्यात घोंघवत असून या वादळाचा सामना करण्यास महावितरणची यंत्रणा सज्ज होती. नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, घाबरू नये . नाशिक परिमंडळात अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते,अभियंते जनमित्र व कामगार कार्यरत असून नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या तसेच नाशिक येथील नियंत्रण कक्षाचे ७८७५३५७८६१ आणि ७८७५७६६३५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.याशिवाय आपल्या क्षेत्रातील महावितरणचे कक्ष कार्यालय व अभियंता यांना संपर्क करावा असेही आवाहन महावितरणने केले आहे