नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दगडफेक करीत तरूणाने शिवशाही बस फोडल्याची घटना औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका भागात घडली. या घटनेत बसची पुढील काच फुटल्याने नुकसान झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश राजेंद्र जाधव (२४ रा.नांंदूरनाका) असे बसवर दगडफेक करणाºया संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी श्यामलाल उत्तमराव बनकर (रा.औरंगाबाद) या बसचालकाने तक्रार दाखल केली आहे. बनकर एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारात चालक या पदावर कार्यरत असून ते सोमवारी (दि.२५) औरंगाबाद नाशिक या शिवशाहीवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. नाशिकच्या दिशेने प्रवासी घेवून निघालेली एमएच ०९ ई २२७० नांदूरनाका येथील सिग्नलवर थांबली असता संशयिताने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसची पुढील काच फुटल्याने नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.