मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) शी संबंधित नियमात मोठा बदल केला आहे. सेबीने म्हटले आहे की, इक्विटी शेअर्स आणि परिवर्तनीय कागदपत्रांच्या आयपीओसाठी अर्ज करणारे वैयक्तिक गुंतवणूकदार युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे ५ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात.
यासोबतच या गुंतवणूकदारांना बोली आणि अर्जामध्ये यूपीआय आयडी देण्यासही सांगण्यात आले आहे. शेअर ब्रोकर्स, डिपॉझिटरी सहभागी आणि कोणत्याही आयपीओचे रजिस्ट्रारमार्फत किंवा एजंटद्वारे यासंबंधित अर्ज जमा करण्यास सांगण्यात आले आहे. सेबीने आपल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की १ मे २०२२ रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या आयपीओसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने वाढीव यूपीआय मर्यादेसह अर्ज प्रक्रिया करण्याच्या सोयीचे पुनरावलोकन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिसेंबर २०२१ मध्ये ही मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली होती.
हा नवीन नियम अशा वेळी येत आहे जेव्हा एलआयसीसह अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. एलआयसीचा आयपीओ मे महिन्यात रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला होईल असा अंदाज आहे. एलआयसी हा देशातील सर्वात मोठा आयपीओ मानला जातो.
गेल्या दोन वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गुंतवणूकदार आता शेअर बाजाराकडे आकर्षिक केले आहेत. मात्र अनेकांना शेअर बाजाराचे नियम, सेबीची मार्गदर्शक तत्वे याबद्दल माहित नसल्याने नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. सद्यस्थितीत सेबीने केलेले हे सुधारित नियम गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरु शकतात, असे सांगण्यात येत आहे.