मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टॉक ब्रोकर्सकडून होणारी फसवणूक तसेच आर्थिक गैरव्यवहार यावर नियंत्रण आणण्यासाठी सेबी लवकरच एक नवीन यंत्रणा निर्माण करणार आहे. यामुळे स्टॉक ब्रोकर्सकडून होणारी फसवणूक थांबणार आहे. तसेच, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळेल. सेबीचा हा एकप्रकारे मोठा सर्जिकल स्ट्राईक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सेबीने अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली असून त्यात सूचीबद्ध कंपन्यांच्या बोर्डावर कायमस्वरूपी संचालकपद धारण केलेल्या व्यक्तींची प्रथा संपुष्टात आणली आहे. हे पाऊल कॉर्पोरेट गव्हर्नन्स इकोसिस्टमला आणखी चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्याचसोबत शेअर बाजारामध्ये स्टॉक ब्रोकर्सकडून फसवणूक झालेल्या अनेक तक्रारी सेबीकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच या स्टॉक ब्रोकर्सकडून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराच्या घटनाही घडल्याचं समोर आले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता सेबीने एक फ्रेमवर्क तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.
इनिशियल पब्लिक ऑफरिंग्जसाठी केल्या जाणाऱ्या दुय्यम बाजार व्यवहारांसाठी फंड-ब्लॉकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या गैरवापरापासून गुंतवणूकदारांच्या पैशाचे रक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे. या संदर्भात स्टॉक ब्रोकर्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या जातील ज्यात व्हिसल-ब्लोअर पॉलिसी तसेच व्यापार व्यवहारावर आणि अंतर्गत नियंत्रणांवर पाळत ठेवण्यासाठी एक प्रणाली देखील प्रदान केली जाईल. सुधारित निकष हे स्टॉक ब्रोकर आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यावर नियंत्रण ठेवतील. सेबीच्या या सुधारणा १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होतील.
काय आहे सेबी?
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी ही भारतातील आर्थिक नियामक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १२ एप्रिल १९८८ रोजी झाली आणि सेबीकायदा, १९९२ अंतर्गत ३० जानेवारी १९९२ रोजी तिला वैधानिक मान्यता प्राप्त झाली. सेबीचे मुख्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे आणि नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत.
Stock Brokers Cheating Sebi Big Decision Share Market