विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूसह आता काळी बुरशी संसर्गाचे (म्युकरोमायकोसिस) रुग्ण वाढू लागले आहेत. अनेक राज्यांमध्ये बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. म्युकरोमायकोसिसचे रुग्ण वाढीमागे कोरोना विषाणू जबाबदार आहेच, शिवाय जीवनसत्व असलेले संप्रेरक (स्टेरॉइड) लाही जबाबदार ठरविण्यात आले आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, मधुमेही, कोरोनाबाधित आणि स्टेरॉइड घेणाऱ्या रुग्णांना बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे स्टेरॉइडचा दुरुपयोग रोखला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुलेरिया म्हणाले की, हा आजार चेहरा, नाक, डोळे किंवा मेंदूला प्रभावित करू शकतो. फुफ्फुसांतही संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. या संसर्गाला रोखण्यासाठी आपल्याला नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हा दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग असून मृत्यूचे कारण ठरत आहे.
देशातील १० राज्यात कोविडच्या ८५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे. ११ राज्यांमध्ये कोरोना संसर्ग असलेल्या एक लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आठ राज्यांमध्ये ५० हजार ते एक लाखांदरम्यान रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ राज्यात संसर्गाचा दर १५ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.