नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देश आधीच पेट्रोल, डिझेल दरवाढीने होरपळत असताना, दुसरीकडे स्टीलच्या दरवाढीने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्टीलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ५८ रु. प्रतिकिलो असलेल्या स्टीलने या महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात उसळी घेतली असून थेट ७० रु.पर्यंत पोहचल्याने बांधकाम क्षेत्रात या दरवाढीने चिंता वाढली आहे.
केंद्र सरकारच्या पातळीवरून स्टील, सिमेंट दरवाढीवर नियंत्रण नसल्याने केली जात आहे. कोरोनाच्या संकटात अडकलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आत्ताच कुठे चालना मिळत असतांना बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संधी आलेली असताना या दरवाढीमुळे बांधकाम व स्टील विक्री करणारे व्यावसायिक यांच्यामध्ये चिंता वाढली आहे.या दरवाढीचा परिणाम थेट ग्राहक वर्गावर देखील होणार असून प्रतिचौरस फुटामागे किमान ५०० रु.दरवाढ होणार असल्याची चर्चा बांधकाम व्यावसायिकांमध्ये ऐकू येत आहे. स्टील व्यवसायातील प्रमुख कंपन्या म्हणून टाटा स्टील, जिंदाल, श्रीओम, गार्डियन, राजुरी, कालिका, आयकॉन, पोलाद यांसारख्या कंपन्यांच्या स्टीलला अधिक मागणी असते त्यात टाटा व जिंदाल यांच्या दरात होणारी वाढ लक्षणीय ठरेल.
भारतात सर्वाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी विशेष घोषणा करताना गरिबांसाठी घरे बांधण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून या स्टीलच्या दरवाढीने मोठा फरक पडणार आहे. लॉकडाऊन पूर्वी या स्टीलचे दार अगदी ५५ रु.इतके होते यात ५५, ५८, ६०, ६५, ६८ आणि आता थेट ७० रु. पर्यंत टप्प्याटप्याने वाढ झाली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांमध्ये गृह कर्जात कपात, मोठ्या प्रकल्पांमध्ये छोट्या आकाराची घरे बांधण्यासाठी बिल्डर्सला प्रवृत्त करणे आदी योजनांचा समावेश होता. एकीकडे गरीबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देताना दुसरीकडे स्टील व सिमेंटच्या दरातील वाढ रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. या दराचा सर्वसामान्यांवर जरी फरक पडत नसला तरी बांधकामासाठी घरे बांधण्यासाठी स्टीलचा मोठा वापर होत असतो. बांधकामाच्या खर्चापैकी ५० टक्के खर्च या स्टीलवर अधिक होतो. त्यामुळे हा खर्च यापुढे वाढणार तर आहेच परंतु यामुळे घरांच्या किमती रोखणे अशक्य असते. मात्र, दोन्ही वस्तुंच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात स्टीलच्या दरात वाढ झाली आहे.
यासंदर्भात प्रख्यात बांधकाम व्यावसायिक भाविक ठक्कर म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये स्टीलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केवळ स्टीलच्या दरवाढीमुळे बांधकामाचे दर प्रति चौरस फुटामागे १५० ते १७५ रुपयांनी वाढणार आहेत. परिणामी, एकूण बांधकाम खर्च खुपच वाढणार आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवरही होणार आहे.
स्टील व्यावसायिक संदीप घुले म्हणाले की, सर्वसामान्यपणे बांधकाम व्यावसायिक शेकडो टन स्टील एकाच वेळी खरेदी करतात. त्याचा परिणाम मोठ्या रक्कमेमध्ये मोजावा लागतो. त्यामुळे हा फरक भरून काढताना दर वाढवणे अपरिहार्य ठरते.