विशेष प्रतिनिधी, मुंबई
लाल परी म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा एक भागच. महागाईच्या फेऱ्यामध्ये आता एसटीही आली आहे. इंधन दरवाढीमुळे चिंताक्रांत असलेल्या सर्वसामान्यांना आता बस दरवाढीलाही सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा मोठा परिणाम एसटी महामंडळावर झाला आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला भाडेवाढ शिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा म्हणजेच एसटी महामंडळाला गेल्या अनेक वर्षांपासून सतत तोटाच होत आहे. वास्तविक राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा ही एक जीवनवाहिनी आहे. कारण दररोज लाखो नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी एसटी बसमधून प्रवास करतात. मात्र कोरोना संकटामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. याशिवाय बससेवा सुरू ठेवताना अनेक नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना काळात बससेवा सुरू ठेवण्यासाठी सॅनिटायझेशन, कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची वेळोवळी होणारी तपासणी या सगळ्यावरील खर्चात वाढ होत आहे. यामुळे उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तोटा वाढत असल्यामुळे परिवहन महामंडळाने एसटी बससेवेच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या मर्यादीत प्रमाणात बस धावत आहेत. यामुळे दरमहा आठ लाख लिटर डिझेल लागते पण पूर्ण क्षमतेने सेवा देण्यासाठी साडेबारा लाख लिटर डिझेल लागणार आहे. यामुळे खर्चात वाढ होईल.
आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने राज्य शासनाकडे १७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे किमान पाच रुपयांची भाडेवाढ होईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाने नऊ किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्त अंतराच्या टप्प्यांसाठी तिकीट दरात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे १०० किमी पर्यंतच्या प्रवासाकरिता किमान २० ते २५ रुपये अधिक मोजावे लागतील. त्याशिवाय एसी बसच्या प्रवासी भाड्यातही वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाने सादर केला आहे. या दरवाढीमुळे एसटीची साधी बस, सेमी लक्झरी, तसेच सर्व एसी बस यांच्या दरात वाढ होऊ शकते. राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ही दरवाढ लागू होईल, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.