विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात ३० मे पर्यंत लॉकाडऊन राहण्याची चिन्हे आहेत. दिल्लीसह विविध राज्यांनी लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळेच लॉकडाऊन लांबण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. बुधवारी (१२ मे) ही बैठक होणार असून त्यात सर्व मंत्र्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
राज्यातील कोरोना स्थितीबाबत राज्य टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात आहे. राज्यातील कोरोना संसर्ग, सद्यस्थिती आणि आगामी धोका यासंबंधीचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची तयारी आणि संभाव्य धोके यांचाही विचार केला जाणार आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन लावल्याने कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही धोका कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Decision over extension of lockdown in the state will be taken in the cabinet meeting tomorrow: Maharashtra Health Minister Rajesh Tope#COVID19 pic.twitter.com/5xmrHwzx2r
— ANI (@ANI) May 11, 2021