मुंबई – ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासानाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.