नवी दिल्ली – देशभरात कोरोना काळात सफाई कर्मचार्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. लॉकडाउन काळात अख्खा देश घरात असताना प्राणांची परवा न करता सर्व कोरोना वॉरियर्स मैदानात उतरले होते. त्यांच्या या कार्याची दखल दिल्ली सरकारने घेतली असून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १ कोटी रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जात असल्याने देशभरात ही बाब विशेष चर्चेची ठरत आहे.
कोरोना विषाणूमुळे जीव गमावलेल्या ईएमसीडीच्या महिला सफाई कर्मचारी सुनिता यांच्या कुटुंबीयांची आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी कुटुंबीयांना एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. केजरीवाल यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, मी सुनिता यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. पीडित कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कुटुंबीयांना भविष्यात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दिल्ली महापालिकेच्या पूर्व विभागात सुनिता ह्या सफाई कर्मचारी होत्या. कोरोना ड्युटीदरम्यान संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
केजरीवाल म्हणाले, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १८ कोरोना वॉरियर्सच्या कुटुंबीयांना आम्ही आतापर्यंत एक-एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सुनिता ह्या मेहनती आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी होत्या. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीतील नागरिकांची सेवा केली. आम्ही त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकत नाही. परंतु थोड्या आर्थिक मदतीद्वारे आम्ही त्यांना सहाय्य करू शकतो.
दिल्ली सरकारने आतापर्यंत दोन सफाई कर्मचार्यांना एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. संपूर्ण देशात फक्त दिल्ली सरकारने अशी मदत केली आहे. सफाई कर्मचार्यांनी केलेली मेहनत आणि शहर स्वच्छ ठेवण्यास दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यादरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणार्या सर्व कोरोना वॉरियर्सचा आम्हाला अभिमान आहे.