विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब आकार,कर्जावरील दंडनीय व्याज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरीता व्याज माफीच्या सवलतीची अभय योजना राबविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या १४८ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, डोंगराळ/ पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली.
जळगावला मंडळ कार्यालय
जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एक मंडळ कार्यालय स्थापन करण्यास तसेच धुळे व उदगीर येथे विभागीय कार्यालय निर्माण करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कनिष्ठ अभियंता उपलब्धी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी) यांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्या पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिरभावी व 81 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर, खामगाव पाणीपुरवठा योजना काही अटींच्या अधीन राहून खामगाव नगरपरिषदेला हस्तांतरित करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीस नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे,नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.