मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारला आमदारांच्या स्वीय सहायक आणि वाहन चालक यांची मोठी काळजी आहे. त्यामुळेच या दोघांचाही पगार वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीतही भरघोस वाढ केली आहे. त्यामुळेच आमदारांना आता स्थानिक विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी ही रक्कम ४ कोटी रुपये एवढी होती. म्हणजे, तब्बल १ कोटी रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही विधिमंडळात घोषणा केली आहे.
आमदारांच्या वाहनचालकाला आणि २० हजार रुपये तर स्वीय सहायक (पीए)ला ३० हजार रुपये पगार मिळणार आहे. यापूर्वी वाहनचालकाला १५ हजार रुपये तर पीएला २५ हजार रुपये पगार महिन्याकाठी मिळत होता. म्हणजेच, सरकारने या दोघांच्याही पगारात प्रत्येकी ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहातील आमदारांना या वाढीव निधीचा लाभ मिळणार आहे. राज्यात सध्या विधानसभेचे २८८ तर विधान परिषदेचे ७८ आमदार आहेत. या सर्वांना हा लाभ होणार आहे.