नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र तीन महिन्यांत ऑनलाईन पद्धतीने देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली. अठरा वर्षांवरील अनाथांच्या विविध प्रश्नांबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. लोढा बोलत होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, “अनाथांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अनांथांना सोयीसुविधा देण्याबाबत सकारात्मक विचार केला जात आहे. अनाथांसाठीच्या योजना राबविण्यासाठी अनाथ विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे बैठक घेण्यात येईल. अनांथांमध्ये कौशल्य विकास होण्यासाठी राज्यातील अनाथालयांमध्ये कौशल्य केंद्र सुरु करण्यात येईल”.
“पदभरतीमध्ये अ प्रवर्गासह ब आणि क प्रवर्गाच्या पदांसाठी अनाथ आरक्षण लागू करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. बालकाश्रमातील प्रशासनाच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. या बालकाश्रमांच्या इमारती व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बैठक घेण्यात येईल. बालकाश्रमातील सोयीसुविधांबाबत आणि कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांबाबत सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. येत्या तीन ते सहा महिन्यांत हा सर्व्हे पूर्ण करुन राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. अनधिकृत अनाथालयांबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल”, असे मंत्री श्री. लोढा यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नांना उत्तर देतांना सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, राजेश राठोड, प्रसाद लाड, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहिर यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.
State Government Big Announcement Orphan Certificate
Maharashtra State Assembly Winter Session Nagpur