मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थी विकासाच्या दृष्टीकोनातून शाळांमध्ये विविध योजना राबविल्या जात असतात. हल्ली क्रमिक पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडेही लक्ष दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तास सुरू करण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. क्रीडा विषयाचा तास अभ्यासाइतकाच महत्त्वाचा असल्याने हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वी खेळाचा एक तास सक्तीचा होता. आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करण्याचे धोरण शासन तयार करणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. क्रीडा तास सक्तीचा करण्याबरोबरच आणखी काही याच संदर्भातले निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले की, ‘‘खेळांना प्रोत्साहन देणे ही महाराष्ट्र सरकारसाठी प्राधान्य आहे. २००३ साली क्रीडा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १९ वर्षांपासून सरकारला आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही हे दुर्दैव आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मी माझ्या खात्यासोबत बैठक घेऊन समस्या आणि त्या कशा सोडवायच्या याचा आढावा घेणार आहे.” संकुल प्रमुखांच्या पदांवर मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी सभागृहाला सांगितले की, धोरणाच्या माध्यमातून १०० पदे निर्माण करण्यात आली असून, त्यापैकी ३५ पदे भरण्यात आली आहेत. ही पदे भरणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या महिन्याच्या अखेरीस मुलाखती संपतील, असे आश्वासन विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. हा तास सक्तीचा केला जात असल्याने क्रीडा विषयाला न्यायदेखील मिळेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
State Government Announcement about School Sports Period
Sports Minister Girish Mahajan Assembly Session
Vidhan Parishad