नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली
निवेदनात मंत्री श्री. पाटील म्हणाले, “यापूर्वी उप अभियंता संवर्गातील २०७ पदांपैकी १८२ पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील १ हजार १७२ पदांपैकी १ हजार ९४ पदांची वाढ करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये दोन-तीन तालुक्यांकरिता एक उप अभियंता कार्यालय होते. आता प्रत्येक तालुक्याला उप अभियंता कार्यालय देणार आहे. १७३ ऐवजी १८३ उप अभियंता कार्यालय होणार आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग अधिक मजबूत होणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती मिळणार आहे”, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी शासन सकारात्मक
वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये 25 ते 30 वर्षापासून राहणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना मालकी हक्काच्या सदनिका वाजवी दरात देण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. वांद्रे वसाहत पुनर्विकास आणि तेथील रहिवाशी याबाबत सदस्य ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास प्रजासत्ताक कोरिया यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी बृहत आराखडा आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कोरिया लँड अँड हौसिंग कॉर्पोरेशनसोबत करारनामा केला आहे. 25 ते 30 वर्षांपासून राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
State Government 1313 Post Recruitment Assembly