मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील २८३ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी बीएएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याबाबत ३१ जानेवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून २८३ उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत.
या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे अनुषंगाने बीएएमएस च्या २८३ पदांसाठी एकूण २२९८१ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले. पदभरतीला उमेदवारांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी आयबीपीएस संस्थेमार्फत ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेसाठी १८७१५ उमेदवार उपस्थित होते. ऑनलाईन परिक्षेचा ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी निकाल जाहिर केला असुन निवड केलेल्या 283 उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. जाहिरातीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १ फेब्रुवारी २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आलेली होती. या पदभरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.