पाटणा – दारू माफियांशी संगनमत करून अवैधरित्या कमाई करण्याच्या आरोपावरून मोतिहारी येथील उत्पादन शुल्क अधीक्षक अविनाश प्रकाश यांच्यावर कारवाई झाली आहे. विशेष देखरेख संस्थेने (एसव्हीयू) मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. पाटणा, मोतिहारी, खगडिया येथे झालेल्या छापेमारीदरम्यान कोट्यवधींच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे मिळाली आहेत.
पाटण्यात फार्म हाउससदृश्य घराशिवाय अनेक ठिकाणी मालमत्ता आढळली आहे. जेसीबी आणि नोटा मोजण्याची मशीनही सापडली आहे. त्यांच्यावर दारू माफियांशी लागेबांधे असल्याचाही आरोप आहे. एसयूव्हीच्या माहितीनुसार, अविनाश प्रकाश खगडियाच्या चित्रगुप्तनगर पोलिस ठाण्याच्या राजेंद्रनगर येथील डीएव्ही चौक येथील रहिवासी आहे. त्यांच्यावर पदाचा गैरवापर करून आपल्या सेवाकाळात ज्ञात स्रोतांहून अधिक माया जमवल्याचे पुरावे मिळाले आहेत.
काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांसोबत संगनमताने मनी लाँड्रिंगचे प्रयत्न केले आहे. खगडिया येथील घराची, पाटणाच्या कुरकुरीमधील आलिशान घराची आणि मोतिहारीच्या छितौना पोलिस ठाण्याच्या छोटा बरियारपूर येथील राधिकाकुंजच्या घराची झडती घेण्यात आली.
पाटण्यात फार्महाउस
एसव्हीयूच्या माहितीनुसार अविनाश प्रकाश यांचे पाटणामध्ये फुलवारी शरीफ येथील कुरकुरीमध्ये फार्म हाउससारखे घर आहे. हे घर एक एकरवरील परिसरात बांधण्यात आले असून सर्वसुविधा युक्त आहे. झडतीसाठी पथक पोहोचल्यावर त्यांना सुंदर बागा, १० गायींचे गोठे आणि अनेक नोकर-चाकर काम करताना दिसले. यादरम्यान येथे नोटा मोजण्याची मशिनही आढळली. याशिवाय पाटण्यात एक फ्लॅट खरेदी केल्याचे संमतीपत्रही सापडले आहे. अविनाश प्रकाश यांच्याकडे कोट्यवधींची स्थावर मालमत्ता, रोख रक्कम, दोन जेसीबी, एक इनोव्हा कार आढळले आहे. खगडिया येथे एक आलिशान घर आणि तिथे एक जेसीबी मिळाली आहे.
वडील आणि पत्नीच्या नावावर २३ प्लॉट
प्रकाश यांच्या पत्नीच्या नावावर ४१ डिसिमिलचे ३ प्लॉट आणि वडील नित्यानंद चौधरी यांच्या नावावर २०० डिसिमिलचे २० प्लॉट सापडले आहेत. ते खरेदी करण्यासाठी ५६.७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यांचे एचडीएफसी बँकेत ५, अलाहाबाद बँकेत १, एसबीआयमध्ये ५, युनियन बँकेत ३ आणि कॅनरा बँकेत १ खाते आढळले आहे. विविध विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे पुरावे मिळाले आहेत. एका झडतीदरम्यान टॅक्सीच्या नोंदणीचे कागदपत्र मिळाले आहेत.
९४ लाखांहून अधिक संपत्ती
अविनाश प्रकाश यांनी सरकारी सेवेत राहून अनैतिक पद्धतीने माया जमविली आहे. ही संपत्ती माहिती असलेल्या स्त्रोतांपेक्षा खूपच जास्त आहे. या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध ९४,०५०० रुपयांहून अधिक संपत्ती बेकायदेशीर आणि अवैधरित्या जमविल्याच्या आकोपावरून गुन्हा दाखल करून छापेमारी करण्यात आली आहे.