नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन जणांना गजाआड करुन वाहनांसह कोट्यावधींचा मद्यसाठा हस्तगत केला आहे. एक्साईज विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहिली कारवाई महामार्गावरील विल्होळी शिवारात करण्यात आली. खब-याने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथक क्र. १ ने हॉटेल अनमोल समोर वाहन तपासणी केली असता डीडी १ एम ९४४१ या पीकअकपमध्ये दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेश निर्मित विदेशी मद्यासह बिअरचे सुमारे ११५ बॉक्स मिळून आले.
याप्रकरणी चालक चेतन इश्वरभाई पटेल (रा.डुगरा जि.वलसाड) यास बेड्या ठोकण्यात आल्या असून, वाहनासह मद्यसाठा असा सुमारे १६ लाख ७० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विभागीय उपायुक्त डॉ. बा. ह. तडवी व अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे. एस. जोखेरे, दुय्यम निरीक्षक आर. सी. केरीपाळे, वाय. बी. पाटील, जवान सुनिल दिघोळे, व्ही. एस. चव्हाण, राहूल पवार व चालक के. जी. कसबे आदींच्या पथकाने केली.
दुसरी कारवाई येवला येथील विंचूर चौफुली भागात करण्यात आली. कोपरगाव – मनमाड मार्गे मोठ्याप्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२३) रात्री विभागीय उपायुक्त डॉ.बा.ह.तडवी व अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने विंचूर चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली. वाहन तपासणीत एमएच १८ बीजी ७८५८ या सहा चाकी ट्रकमध्ये लाकडी भुसा भरलेल्या गोण्यांखाली गोवा निर्मीत व राज्यात विक्रीस बंदी असलेल्या रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या दारूचे तब्बल ९५० बॉक्स मिळून आले. सद्दामखान रशिद खान (रा.खडकवाणी जि.खरगोन मध्यप्रदेश) या ट्रकचालकासह संतोष बलराम कर (रा.पोर्वोरिम,नॉर्थ गोवा) या क्लिनरला बेड्या ठोकत पथकाने वाहनासह तब्बल ८४ लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस.चव्हाण,दुय्यम निरीक्षक अ.गो.सराफ जवान भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर, महेश सातपुते, धनराज पवार आदींच्या पथकाने केली. या कारवाई करीता येवला विभागाचे निरीक्षक व्ही.ए.चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाघचौरे, जवान विठ्ठल हाके, एम.ई.तडवी, एम.एन.निंबेकर, संतोष मुंडे आदींनी मदत केली. अधिक तपास निरीक्षक चव्हाण करीत आहेत.