विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने अखेर १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. या वयोगटासाठी राज्य सरकारतर्फे मोफत लस देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने मात्र आता हे लसीकरण स्थगित करण्याचे निश्चित केले आहे. लसीची उपलब्धता होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीचा मोठा तुटवडा आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. यासाठीच आपण १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित करुन ४५ वर्षे वयापुढील ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस उपलब्ध करुन देणार आहोत, असे टोपे यांनी स्पष्ट केले. १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या लस ४५ वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी वापरण्याचे यापूर्वीच सरकारने जाहिर केले आहे. लसीचा मुबलक पुरवठा व्हावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. जसा पुरवठा वाढेल, तसा लसीकरणाला वेग दिला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.