नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. बँकेने म्हटले आहे ,की ग्राहक कोणत्याही ओळखपत्र पुरावा आणि फॉर्म भरल्याशिवाय बँकेच्या विविध शाखांमधून २ हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतील. २० हजार रुपयांपर्यंतच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलता येतील. एसबीआयचे हे स्पष्टीकरण सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांनंतर समोर आले आहे, ज्यात दावा केला जात होता की २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र, आधार कार्ड दाखवण्यासोबतच एक फॉर्मही भरावा लागेल. .
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी २ हजारच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या काळात ग्राहक बँकांमध्ये जाऊन त्यांच्या २ हजारच्या नोटा इतर चलनी नोटांसह बदलू शकतात. आता, स्टेट बँकेने आपल्या सर्व स्थानिक मुख्य कार्यालयांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार, २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजार रुपयांच्या नोटा कोणत्याही ओळखपत्र पुराव्याशिवाय आणि डिमांड स्लिपशिवाय बदलल्या जाऊ शकतात अशी माहिती दिली आहे.
यासाठी मर्यादा नाही
रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा स्वत:च्या खात्यात जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु ती ग्राहकांच्या केवायसी आणि इतर वैधानिक नियमांवर अवलंबून असेल. २० मे रोजी पाठवलेल्या माहितीमध्ये SBI ने म्हटले आहे की २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. बँकेने आपल्या अधिकाऱ्यांना जनतेला सहकार्य करण्यास सांगितले आहे. जेणेकरून २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय आणि सहजतेने पूर्ण करता येईल.
२३ मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार होती मात्र काही व्यक्ती शनिवारीच बँकेत पोहोचले. एसबीआयने सांगितले की, अशा व्यक्तींना समजावल्यानंतर परत पाठवण्यात आले. काही ग्राहकांनी बँकेत २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी डिपॉझिट मशीनचा वापर केला. काही व्यक्तींनी दोन हजाराच्या नोटा खरेदी करून खर्च करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिझर्व्ह बँकेच्या नोटिफिकेशननंतर लोक २ हजाराच्या नोटा बाजारात घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
State Bank SBI on 2 Thousand Notes Deposition